हवेत उंच उडी मारून लगावलेले दमदार स्मॅशेस.. ड्रॉप-शॉट्स, क्रॉस कोर्ट्स फटक्यांची बरसात.. नेटवरील परतीच्या फटक्यांचा सुरेख नजराणा.. हैदराबाद हॉटशॉट्सचे वर्चस्व आणि ‘सायना’ नामाचा अविरत जयघोष.. यामुळे वरळीतील एनएससीआयचे सरदार वल्लभभाई स्टेडियम सोमवारी दणाणून गेले होते. सायना नेहवालच्या झंझावाती खेळाची मेजवानी अनुभवल्यानंतर स्टेडियममधील प्रत्येकाच्या मुखात ‘सायना, जिंकलंस’ असेच उद्गार उमटत होते. हैदराबाद हॉटशॉट्सने सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून आयबीएलमधील सलग दोन लढतीत अपराजित राहणाऱ्या पुणे पिस्टन्सचा धुव्वा उडवला.
मुंबईत प्रथमच खेळणाऱ्या सायना नेहवालच्या कामगिरीबाबत सर्वानाच उत्सुकता होती. बेसलाइनवर बऱ्याच चुका केल्याचा फटका सायनाला भोवला. पण पहिला गेम गमावल्यानंतर विजेसारखा सायनाच्या कामगिरीचा लखलखाट सर्वानीच अनुभवला. सायनाने जर्मनीच्या ज्युलियन श्चेंकवर १७-२१, २१-१९, ११-६ अशी सरशी साधत तिच्याविरुद्धची कामगिरी ४-८ अशी सुधारली. त्याआधी, मुंबईकर अजय जयरामने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या टिएन मिन्ह युगेनला हरवून घरच्या प्रेक्षकांची मने जिंकली. अजयने पहिला सामना २१-१९, २१-८ असा सहज खिशात टाकला होता.
कोर्टवर सहज वावरणाऱ्या लवचिक श्चेंकसमोर पहिल्या गेममध्ये सायनाच्या हालचाली धीम्या गतीने होत होत्या. सायनाने नेटवर सुमार खेळ केल्यामुळे श्चेंकने १४-८ अशी आघाडी घेतली. सायनाने तिला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण सायनाला हा गेम १७-२१ असा गमवावा लागला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने ड्रॉप-शॉट्सच्या फटक्यांवर भर देत थाटात पुनरागमन केले. दमदार स्मॅशेस लगावून तिने श्चेंकला चोख प्रत्युत्तर दिले. १३-१३, १६-१६ आणि त्यानंतर १९-१९ अशा उत्कंठावर्धक झालेल्या या गेममध्ये सलग दोन गुण मिळवून सायनाने दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. दुसऱ्या गेममध्ये खेळ बहरल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. निर्णायक गेममध्ये सायनाने सुरुवातीलाच ४-१ अशी आघाडी घेतली होती. नेटवरचा भन्नाट खेळ आणि श्चेंकचे स्मॅशेसचे फटके लिलया परतवून लावत सायनाने ११-६ अशी बाजी मारून हैदराबादची आघाडी २-० अशी वाढवली. सामना जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सायनाचे अभिनंदन केले. सायनानेही प्रेक्षकांचे आभार मानून त्यांची दाद मिळवली.
सायनाच्या लढतीनंतर जवळपास अर्धे स्टेडियम रिकामी झाले. पण व्ही. शेम गोह आणि वाह लिम लिम यांनी पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात पुण्याच्या सनावे थॉमस-रुपेश कुमार जोडीवर २१-१९, २१-१६ असा विजय मिळवून हैदराबाद हॉटशॉट्सला निर्भेळ यश मिळवून दिले.