व्यग्र आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) दुसऱ्या पर्वाला पुढील वर्षीचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धामुळे ही स्पर्धा सप्टेंबरऐवजी २०१५च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीच्या आयबीएलने प्रचंड लोकप्रियता मिळवत जागतिक बॅडमिंटनमध्ये नवा मापदंड निर्माण केला होता. त्यामुळे आयबीएलचे दुसरे पर्व या वर्षी ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार होते. ‘‘या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा तर सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धामुळे अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आयबीएलमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. हे लक्षात घेऊनच आम्ही आयबीएल स्पर्धेच्या तारखा बदलणार आहोत. अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नसला तरी पुढील वर्षीच ही स्पर्धा खेळवण्याचा आमचा विचार आहे,’’ असे भारतीय बॅडमिंटन महासंघाचे उपाध्यक्ष टी. पी. एस पुरी यांनी सांगितले.

सिंधू, श्रीकांतवर भारताची मदार
नवी दिल्ली : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने माघार घेतल्यामुळे गिमचेओन (दक्षिण कोरिया) येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची प्रमुख भिस्त किदम्बी श्रीकांत व पी. व्ही. सिंधू यांच्यावर असेल. सिंधूला पहिल्या फेरीत च्युंग निगान यि हिच्याशी खेळावे लागेल.