भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी २०१७ हे वर्ष खऱ्या अर्थाने सुगीचं गेल. किदम्बी श्रीकांत, साई प्रणीत, एच. एस. प्रणॉय यांनी पुरुष एकेरीत तर महिलांमध्ये रिओ ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने सर्वोत्तम कामगिरी करत, महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीयांचा दबदबा कायम राखला. मात्र भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत अमुलाग्र बदल करण्यासाठी मदत करणारा हात भारतीय खेळाडूंसोबत नव्या वर्षात नसण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक म्युलो हांदयो यांनी आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. हांदयो इंडोनेशियाला परतल्याचं समजतंय.

गेलं वर्षभर हांदयो हे आपला मुलगा आणि पत्नीसोबत भारतात राहत आहेत. मात्र आपल्या परिवाराला भारताच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात मुलाची तब्येत बिघडल्यामुळे अखेर हांदयो यांनी आपल्या परिवाराला वेळ देण्याचं ठरवत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. मात्र या विषयी हांदयो यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाहीये.

मुल्यो हांदयो यांच्या काळात भारताच्या महत्वाच्या बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झालेला पहायला मिळाली. किदम्बी श्रीकांतने सर्वोत्तम कामगिरी करत, वर्षभरात ५ सुपर सिरीज स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं. तर काही स्पर्धांमध्ये त्याला उप-विजेतेपदावर समाधान मानावं लागलं. एच. एस. प्रणॉयनेही हांदयो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना चीनच्या काही अव्वल मानांकित खेळाडूंना पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे हांदयो यांनी भारतात न परतण्याचा निर्णय घेतल्यास बॅडमिंटन महासंघाला नवीन प्रशिक्षकांसाठी शोधमोहीम हाती घ्यावी लागणार अशी चिन्ह दिसतं आहेत.