अध्यक्षीय संघाचा पहिला डाव २९६ धावांत आटोपला

दक्षिण आफ्रिकेची २ बाद ४३ अशी अवस्था
सलामीवीर के. एल. राहुल आणि यष्टिरक्षक नमन ओझा यांनी दमदार अर्धशतके झळकावून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी आपली छाप पाडली. त्यामुळेच अध्यक्षीय संघाला पहिल्या डावात २९६ धावसंख्येपर्यंत जेमतेम मजल मारता आली. मग उर्वरित खेळात शार्दूल ठाकूरच्या तेजतर्रार माऱ्याच्या बळावर दक्षिण आफ्रिकेची २ बाद ४६ अशी स्थिती झाली होती.
ब्रेबॉर्न स्टेडियमवरील या सामन्यात अध्यक्षीय संघाने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु उन्मुक्त चंद (४), चेतेश्वर पुजारा (५) आणि श्रेयस अय्यर (९) अपयशी ठरल्यामुळे अध्यक्षीय संघाची ३ बाद २७ अशी केविलवाणी अवस्था झाली. मग राहुल आणि करुण नायर (४४) यांनी चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर ओझा आणि शेल्डन जॅक्सन यांनी सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि फिरकी गोलंदाज सिमॉन हार्मर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोहालीत होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी अंतिम संघ निवडताना फलंदाजीचा क्रम हा संघ व्यवस्थापनापुढे पेच आहे. पाच कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या राहुलने आफ्रिकन माऱ्याचा समर्थपणे सामना करीत १३ चौकारांच्या साहाय्याने ७२ धावांची लक्ष्यवेधी खेळी साकारली आहे. त्यामुळे फलंदाजीसाठी आणखी एक पर्याय असेल. पुजारा मात्र या पूर्वपरीक्षेत नापास झाला आहे. वृद्धिमान साहा अपयशी ठरल्यास पर्याय ठरू शकणाऱ्या ओझाने ७ चौकार आणि एका षटकारांसह ५२ धावांची खेळी उभारून आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. करुण नायर (४४) आणि हार्दिक पंडय़ा (४७) यांनीही छोटेखानी खेळी उभारून अध्यक्षीय संघाच्या धावसंख्येला योगदान दिले आहे.
त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ उर्वरित षटके आरामात खेळून काढेल अशी अपेक्षा होती. मात्र ठाकूरच्या अचूक टप्प्यावरच्या चेंडूंपुढे आफ्रिकेची त्रेधातिरपीट उडाली. स्टियान व्हान झिल (१८) लवकर तंबूत परतला, तर सिमॉन हार्मरला फक्त ४ धावा काढता आल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ शनिवारी अध्यक्षीय संघाच्या गोलंदाजीचा सामना करून किती धावसंख्येपर्यंत मजल मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक
अध्यक्षीय संघ (पहिला डाव) : ७८.५ षटकांत सर्व बाद २९६ (के. एल. राहुल ७२, नमन ओझा ५२, हार्दिक पंडय़ा ४७, करुण नायर ४४; सिमॉन हार्मर ३/४१, डेल स्टेन ३/४६, व्हर्नन फिलँडर २/३७) दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ८.२ षटकांत २ बाद ४६ (स्टियान व्हान झिल १८, डीन एल्गर खेळत आहे १८; शार्दूल ठाकूर २/२८)