टी-२० आणि वन-डे क्रिकेटच्या इतिहासात कसोटी क्रिकेट आपलं स्थान टिकवणार का अशी चर्चा आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे आहेत की ज्यांचं नाव घेतलं की कसोटी क्रिकेट आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ९० च्या दशकानंतर राहुल द्रविडने भारतीय कसोटी संघात आपली तिसरी जागा पक्की केली होती. कमालीचा बचाव आणि तंत्रशुद्ध फटके यामुळे द्रविड नेहमी आपल्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा जेरीस आणायचा. कालांतराने द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली…’द वॉल’ हे बिरुद मिरवणाऱ्या राहुलची जागा चालवणार कोण हा प्रश्न त्याकाळी उभा राहिलेला होता. मात्र चेतेश्वर पुजाराने आपल्या बहारदार खेळीने या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि भारताला आणखी एक भक्कम पर्याय दिला.

गेली काही वर्ष भारतीय कसोटी संघाचा कणा म्हणून काम करत असलेला पुजारा आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करतोय. भारतीय संघाच्या अनेक कसोटी विजयांमध्ये पुजाराचा महत्वाचा वाटा आहे. आतापर्यंत पुजाराने ७५ कसोटी सामने खेळताना ४९.४८ च्या सरासरीने ५७४० धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या नावावर १८ शतकं आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

जाणून घ्या पुजाराबद्दलच्या काही खास गोष्टी –

१) पुजाराचा जन्म २५ जानेवारी १९८८ रोजी राजकोटमध्ये झाला.

२) क्रिकेटचं बाळकडू पुजाराला त्याच्या घरातून मिळालं. पुजाराचे वडिल अरविंद पुजारा हे सौराष्ट्र संघाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये ६ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. तर पुजाराचे काका बिपीन पुजारा यांनीही ३६ रणजी सामन्यांमध्ये सौराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

३) सुरुवातीला पुजाराने अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी पुजाराच्या वडिलांना त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला दिला.

४) २००१ साली १२ वर्षांचा असताना पुजाराने सौराष्ट्राच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाकडून बडोद्याच्या संघाविरुद्ध ३०६ धावांची खेळी केली. आगामी कारकिर्दीसाठी ही खेळी महत्वाची ठरली असं पुजारा नेहमी सांगतो.

५) २००६ च्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पुजारा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. ६ डावात पुजाराने ११७ च्या सरासरीने ३४९ धावा केल्या. मात्र या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

६) २०१० साली भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराला पहिल्यांदा कसोटी संघात जागा मिळाली. दुखापतग्रस्त गंभीरच्या जागी पुजाराला संधी मिळाली. या सामन्यात पहिल्या डावात त्याने ३ तर दुसऱ्या डावात ७४ धावा केल्या.

७) २०१३ साली आयसीसीकडून पुजाराला उदयोनमुख क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला होता.

८) पुजाराने आतापर्यंत आयपीएलमध्ये कोलकाता, बंगळुरु आणि पंजाब संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

९) काऊंटी क्रिकेटमध्येही पुजाराने डर्बिशायर संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.