भारतीय संघाचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी, संघाचा सलामीवीर रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यापासून विक्रम राठोड यांनी आपल्या पदाची सूत्र सांभाळली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला असला तरीही गेल्या काही दिवसांमध्ये रोहित शर्माला कसोटी संघात सलामीवीराच्या जागी मिळालेली बढती हा चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर राठोड यांनी रोहितच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे.

“मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितने सलामीवीर म्हणून आपली कामगिरी चोख बजावली आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याला योग्य आणि पुरेशा संधी मिळाल्या तर तो नक्कीच यशस्वी होईल. रोहित शर्मा भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अंतिम ११ जणांच्या संघात कोणाला स्थान मिळेल हे मी आता सांगू शकत नाही. मात्र रोहितचा आतापर्यंतचा फॉर्म पाहता, त्याला संधी मिळू शकते.” राठोड पत्रकारांशी बोलत होते. सलामीवीर लोकेश राहुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघातून डच्चू मिळाला आहे. याचसोबत पर्यायी सलामीवीर म्हणून युवा शुभमन गिलनेही संघात स्थान मिळवलं आहे.

३२ वर्षीय रोहित शर्मासाठी आफ्रिकेविरुद्ध मालिकेत मिळालेली संधी ‘करो या मरो’ची असू शकते. आतापर्यंत रोहितने २७ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या सामन्यांत रोहितने ३ शतकं आणि १० अर्धशतकांच्या जोरावर १५८५ धावा काढल्या आहेत. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत रोहित शर्मा मिळालेल्या संधीचं सोनं करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.