क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आशावाद

मुंबई : सध्याच्या भारतीय गोलंदाजांमध्ये जगभरातील कोणत्याही खेळपट्टीवर बळी मिळवण्याची क्षमता असून येणाऱ्या काळात ते सर्वच संघांवर अविरत वर्चस्व गाजवतील, असा आशावाद भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केला.

मुंबईत लोअर परळ येथे आयोजित ‘किप मूव्हिंग’ या तंदुरुस्ती मोहिमेच्या अनावरण कार्यक्रमासाठी सचिन उपस्थित होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयाबद्दल विचारले असता सचिन म्हणाला, ‘‘संघातील प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर या विजयाचे महत्त्व किती आहे, हे आपण सर्वानीच पाहिले. तिन्ही पातळ्यांवर प्रतिस्पर्धी संघापेक्षा सरस खेळ केल्यानेच आपण ही मालिका जिंकलो. या मालिका विजयामुळे एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली असून भारतीय गोलंदाजांचे या यशात फार मोठे योगदान आहे.’’

‘‘कसोटी सामन्यांसाठी आवश्यक असलेली तंदुरुस्ती, नियोजित आहार व इच्छाशक्ती या सर्व गोष्टींचा आपल्या वेगवान गोलंदाजांनी योग्य मेळ साधला. प्रत्येकाची नावे घ्यायची झाल्यासच जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांनी प्रामुख्याने अप्रतिम मारा करत संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले. त्याशिवाय कुलदीप यादव, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन हे फिरकीपटू आणि एकमेव सामना खेळलेला उमेश यादव या सर्वानीच संघाला आवश्यक त्या वेळी बळी मिळवून देण्याची भूमिका चोखपणे बजावली,’’ असे सचिनने गोलंदाजांची स्तुती करताना सांगितले.

‘‘ही एका दिवसात घडलेली प्रक्रिया नसून प्रत्येकाच्या अथक मेहनतीनंतरच हे यश साध्य झाले आहे. सध्या भारतासाठी एकापेक्षा एक उत्तम वेगवान गोलंदाज एकाच वेळी चांगले खेळत असून त्यांनी याच जोमाने सज्ज राहावे,’’ असा सल्लाही सचिनने दिला. त्याशिवाय तीन शतकांसह मालिकावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या चेतेश्वर पुजाराचेही सचिनने कौतुक केले. येणाऱ्या काळात भारताने पुजारासारखे कसोटी विशेषज्ञ खेळाडू तयार करण्यावरही भर द्यावा, असेही त्याने सुचवले.