मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करणाऱ्या भारताचा गोलंदाजीचा मारा हा अद्याप जागतिक दर्जाचा असून, त्यांना कमी लेखण्याची चूक करू नका, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे.

वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने भारतावर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात इशांत शर्माने झोकात पुनरागमन करताना एका डावात पाच बळी घेतले, तर जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमीला फक्त एकेक बळी मिळवता आला.

‘‘माझा अजूनही भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्यावर संपूर्ण विश्वास आहे. दुखापतीतून सावरणाऱ्या इशांतने दर्जाला साजेशी गोलंदाजी केली आहे. दुखापतीतून सावरत बुमराही मैदानावर परतला आहे. त्यामुळे एका कसोटीच्या अपयशानंतर लगेच भारताच्या गोलंदाजीवर शंका घेऊ नये,’’ असे मॅकग्राने सांगितले.

भारतीय फलंदाजांना दुसऱ्या कसोटीतही वेगवान गोलंदाजी आव्हानात्मक – वॅगनर

ख्राइस्टचर्च : पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाजांना अनुकूल हॅगले ओव्हलच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना वेगवान आणि उसळणाऱ्या चेंडूंचा सामना करणे आव्हानात्मक ठरेल, असा इशारा न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज नील व्ॉगनरने दिला आहे. कौटुंबिक कारणास्तव वॅगनररने पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. या सामन्यात आखूड टप्प्याच्या चेंडूंवर भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली होती. दुसऱ्या कसोटीतही आम्ही तीच रणनीती वापरू, असे ३३ वर्षीय व्ॉगनरने सांगितले.

स्वप्नवत पदार्पणानंतर अष्टपैलू खेळाडू होण्याचा जॅमिसनचा निर्धार

ख्राइस्टचर्च : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्वप्नवत पदार्पण करणाऱ्या न्यूझीलंडच्या कायले जॅमिसनने अष्टपैलू खेळाडू होण्याचा निर्धार केला आहे. जॅमिसन उमेदीच्या कालखंडात विशेषज्ञ फलंदाज होता; परंतु त्यानंतर उत्तम वेगवान गोलंदाजीही करू लागला. फलंदाज म्हणून सुरुवातीच्या दिवसांत आपली ओळख निर्माण केली होती; परंतु डेली हॅडली यांनी त्याला वेगवान गोलंदाजीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.