भारताची महिला बॉक्सिंगपटू निखत झरीनने बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. निखतने या स्पर्धेच्या 51 किलो वजनी गटामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात निखतने दोन वेळा विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमचा 4-1 असा पाडाव केला.

इस्तांबुल शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेत निखतने आतापर्यंत दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. नाझिमला हरवल्यामुळे निखतचे कांस्यपदक पक्के झाले आहे. 2014 आणि 2016मध्ये कझायबे नाझिमने विश्व विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती. उपांत्यफेरी गाठण्यापूर्वी तिने गतविजेती रशियाची बॉक्सिंगपटू पल्टेसेवा एकटेरिनाला 5-0 असे पराभूत केले.

गौरव सोलंकीचे कांस्यपदक पक्के

झरीनव्यतिरिक्त, 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव सोलंकीने (57 किलो) इकोल मिझानचा 4-1 असा पराभव करत कांस्यपदक पक्के केले आहे.

भारताच्या अन्य महिला बॉक्सिंगपटू सोनिया लादर (59 किलो), परवीन (60 किलो) आणि ज्योती (69 किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पुरुषांमध्ये 63 किलो वजनी गटात शिव थापाला तुर्कीच्या हाकान डोगानकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला.

निखतचा सामना बुसेनाडशी

उपांत्य फेरीत झरीनला आता तुर्कीच्या बुसेनाडशी दोन हात करावे लागणार आहेत. 2019च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये बुसेनाडला रौप्यपदक मिळाले होते. तर, गौरवचा सामना अर्जेंटिनाच्या निर्को कुएलोशी होईल.