भारत आणि चीन यांच्यात डोक्लाम सेक्टर येथे सुरु असलेल्या वादाचे प्रतिसाद आता खेळाच्या मैदानावरही दिसायला लागले आहेत. वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशनच्या सुपर मिडलवेट चँपियनशीपमध्ये विजेंदर सिंहचा सामना चीनच्या जुल्फिकार मैमतअली याच्यासोबत होणार आहे. मात्र या सामन्याआधीच विजेंदर सिंहने मैमतअलीवर शाब्दिक टीका करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

विजेंदर आणि मैमतअलीमध्ये ५ ऑगस्टला हा सामना होणार आहे. मात्र त्याआधीच विजेंदरने मैमतअलीला अनुभवहीन बॉक्सर ठरवून टाकलं आहे. मैमतअली हा तरुण आणि कणखर बॉक्सर आहे, मात्र त्याच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे या सामन्यात त्याला कसं हरवायचं याच्यावर मी आणि माझ्या प्रशिक्षकाने काम सुरु केल्याचं विजेंदरने म्हणलं आहे.

“मैमतअली हा तरुण आहे, आणि अशा वयात तरुण बॉक्सर रिंगमध्ये अनेकदा जोशात येऊन चुका करतात. मैमतअलीही अशाच चुका करु शकतो”, त्यामुळे या सामन्याचा आपल्यावर कोणताही दबाव नसेल असं विजेंदर सिंहने म्हणलंय. विजेंदर सध्या आशियाई पॅसिफीक मिडलवेट चँपियन आहे. तर त्याचा प्रतिस्पर्धी जुल्फीकार मैमतअली हा देखील आतापर्यंत एकही सामना हरलेला नाहीये. हे दोघेही बॉक्सर सुपर मिडलवेट चँपियनशीपमध्ये एकमेकांशी लढणार आहेत.

मैमतअलीच्या आक्रमकतेबद्दल विचारलं असता विजेंदर म्हणाला, त्याच्याकडून आक्रमक खेळ झाला तर मी देखील त्याला तितक्याच आक्रमकतेने उत्तर देईन. सध्या भारत आणि चीन यांच्यात डोक्लाम सेक्टर येथे तणाव सुरु आहे, त्यामुळे अशा कठीण प्रसंगात चिनी प्रतिस्पर्ध्याशी लढत असताना मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असल्याचं विजेंदर सिंहने म्हणलंय. त्यामुळे या सामन्यात मैमतअलीवर मात करुन विजेंदर सिंह पुन्हा एकदा विजेता बनतो का, हे पहावं लागणार आहे.