सेंट पिटर्सबर्ग येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या एआयबीए युवा विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेत सहभाग घेतलेल्या दहापैकी आठ भारतीय बॉक्सिंगपटूंना पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे.

या स्पध्रेसाठी भारताने बलाढय़ संघ पाठवला असून अंकुश दाहिया (६० किलो), आशीष (६४ किलो) आणि रेयाल पुरी (८१ किलो) यांनी आशियाई युवा अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. यापैकी आशीषला पुढे चाल मिळाली नसून त्याला पहिल्या फेरीत अर्मेनियाच्या टोनी गॅलस्टियनचा सामना करावा लागेल, तर श्रीनिवासला ६९ किलो वजनी गटात फ्रान्सच्या मिलन प्रॅटचे आव्हान असेल. या स्पध्रेत ७५ देशांमधील ४१७ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

४९ किलो वजनी गटात भारताच्या सचिनला कोरियाच्या सीनगचॅन बिक आणि मेक्सिकोच्या गुस्ताव्हो अँटोनियो अलव्हारेझ यांच्यातील विजेत्याशी सामना करावा लागेल. राष्ट्रीय विजेता अनवर (५२ किलो) इंग्लंडच्या आकाश तुकीर आणि इताश खान (५६ किलो) क्युबाच्या अ‍ॅलेक्सेई रोमेरा रॉड्रिगेझ व इजिप्तच्या इलसायेद रागब ओमानचा यांच्यातील विजेत्याशी १९ नोव्हेंबरला सामना करेल. पुढच्याच दिवशी अंकुश दाहियाला जर्मनीच्या निक बिएर आणि स्कॉटलंडच्या मार्क रेड यांच्यातील विजेत्याशी खेळावे लागले.

आदित्य मान (७५ किलो) इंग्लंडच्या बेन रेसविरुद्ध खेळेल. ८१ किलो वजनी गटात रेयाल पुरीसमोर अजरबैजानच्या एलखान अलियेव्ह, तर ९१ किलो गटात नमन तनवारसमोर क्रोएशियाच्या मॅरिजॅन बर्निकचे आव्हान आहे. हे सामने २१ नोव्हेंबरला होतील. ९१ किलोवरील गटात मनजीतचा सामना ग्रीकच्या व्हॅगकान नॅनित्झानियन आणि युक्रेनच्या व्हिअ‍ॅचेस्ला हॅव्हरीयुक यांच्यातील विजेत्याशी होईल.