‘स्पाइस जेट’च्या अजय सिंह अध्यक्षपदी; सरचिटणीसपदी महाराष्ट्राचे जय कवळी

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Two new birds recorded in Sanjay Gandhi National Park mumbai
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन नवीन पक्ष्यांची नोंद; पांढरा गाल असलेला तांबट,पिवळा बल्गुलीचे दर्शन
Bird Wardha
आंतरराष्ट्रीय पक्षीगणना ! वर्धा जिल्हा नोंदणीत अग्रेसर, आढळले ‘हे’ पक्षी

देशातील बॉक्सिंग क्षेत्रातील चार वर्षांच्या संघटनात्मक वादावर रविवारी अखेरीस पडदा पडला. मुंबईत पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय बॉक्सिंग महासंघाची (बीएफआय) स्थापना करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी ‘स्पाइस जेट’चे कार्याध्यक्ष व व्यवस्थापक अजय सिंह यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी महाराष्ट्राचे जय कवळी निवडून आले. ही निवडणूक योग्य रीतीने पार पडल्याचे प्रशस्तीपत्र आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) उपाध्यक्ष एडगर टॅनर यांनी दिले. त्यामुळे भारतीय बॉक्सिंगपटूंचे आंतरराष्ट्रीय स्पध्रेत खेळण्याचे दरवाजे उघडले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचा मार्गही मोकळा झाला आहे.

मुंबईतील सचिन तेंडुलकर जिमखाना येथे झालेल्या या निवडणुकीत उत्तराखंडच्या अजय सिंह यांनी ४९ मते मिळवून अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या दिल्लीच्या रोहित जैनेंद्र (१५) यांचा पराभव केला. सरचिटणीसपदासाठी कवळी, गोव्याचे लेन्नी डी’गामा व हरयाणाचे राकेश ठकरन यांच्यात शर्यत रंगली होती. त्यात कवळी यांनी ४८ मतांसह बाजी मारली. मात्र या वेळी भारतीय ऑलिम्पिक समितीने निरीक्षक न पाठवल्यामुळे सर्वानी आश्चर्य व्यक्त केले.

निवडणूक प्रक्रियेवर समाधान व्यक्त करताना टॅनर म्हणाले, ‘‘ही निवडणूक प्रामाणिकपणे पार पडली. भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना झाल्याचा अहवाल एआयबीएला लवकरच पाठवणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पध्रेत भारतीय खेळाडूंचे दमदार पुनरागमन आम्हाला अपेक्षित आहे. जागतिक बॉक्सिंगमध्ये भारत नेहमी अव्वल दहामध्ये राहिला आहे. दुर्दैवाने काही वर्षांतील वादामुळे भारतीय खेळाडूंना तिरंग्याखाली आंतरराष्ट्रीय स्पध्रेत सहभाग घेता आला नाही. मात्र हे वाईट दिवस संपले आहेत.’’

या महासंघाला एआयबीएकडे औपचारिक संलग्नतेसाठी अर्ज करावा लागेल व त्यानंतर डिसेंबरमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये जागतिक संघटना संलग्नतेची औपचारिकता पूर्ण करेल.

बीएफआय आमच्याशी संलग्न नाही -मेहता

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना (आयओसी) आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) यांनी विनंती करूनही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) बॉक्सिंग निवडणुकीला निरीक्षक न पाठवण्याचा निर्णय घेतला. बॉक्सिंग संघटना स्थापन होण्यापूर्वी भारतातील बॉक्सिंगचा कारभार पाहणाऱ्या अस्थायी समितीचे प्रमुख किशन नरसी यांनीही दोन वेळा आयओएला पत्रव्यवहार केले. मात्र त्यालाही आयओएकडून काहीच उत्तर मिळाले नाही. याबाबत आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले की, भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ आयओएशी संलग्न आहे, बीएफआय नाही. त्यामुळेच आम्ही निरीक्षक पाठवला नाही. हौशी महासंघाला निवडणुकीतील गैरप्रकारांमुळे चार वर्षांपूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

कार्यकारिणी समिती

  • अध्यक्ष : अजय सिंह (उत्तराखंड) ’ सरचिटणीस : जय कवळी (महाराष्ट्र)
  • खजिनदार : हेमंता कुमार कलिता (आसाम) ’ उपाध्यक्ष : खोईबी सलाम सिंग (उत्तर-पूर्व), जॉन खारसिंग (पूर्व), अनिल कुमार बोहिदार (दक्षिण-पूर्व), सी. बी. राजे (दक्षिण), अमरजित सिंह (पश्चिम), नरेंद्र कुमार निरवाण (उत्तर-पूर्व), राजेश भंडारी (उत्तर) आणि अनिल कुमार मिश्रा (मध्य) ’  विभागीय सचिव : स्वपन बॅनर्जी (पूर्व), जी. व्ही. रवी राजू (दक्षिण-पूर्व), आर. गोपू (दक्षिण), राजेश देसाई (पश्चिम), दिग्विजय सिंह (उत्तर-पश्चिम), संतोष कुमार दत्ता (उत्तर), राजीव कुमार सिंह (मध्य).

बॉक्सिंग इंडियाच्या बांधणीत घाईघाईत चुका राहिल्या होत्या आणि त्यामुळे ती संघटना कोलमडली. बॉक्सिंग इंडियाच्या वेळी झालेल्या चुका यंदा सुधारण्यात आल्या आहेत. ही बॉक्सिंग इंडियाची सुधारित आवृत्ती आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना करताना एआयबीए, केंद्र सरकार यांच्या नियमांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानुसार ही संघटना स्थापन करण्यात आली. केंद्र सरकारची या संघटनेला मान्यता आहे. एआयबीएचीही मान्यता आहे.

जय कवळी, सरचिटणीस