भारताची बॉक्सर सरिता हिच्या वादग्रस्त पराभवानंतर भारतीय बॉक्सिंग चमूने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडे (एआयबीए) तक्रार दाखल केली होती; पण एआयबीएच्या तांत्रिक समितीने भारताची ही तक्रार फेटाळून लावली आहे. यजमान कोरियाच्या जिना पार्क हिच्याविरुद्ध अप्रतिम कामगिरी केल्यानंतरही पंचांनी सरिताला पराभूत असल्याचा कौल दिला. त्यानंतर भारताने ५०० अमेरिकन डॉलर भरून याविरोधात तक्रार दाखल केली. सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतरच पंच किंवा निदर्शकांच्या विरोधात तक्रार दाखल करता येऊ शकते, या एआयबीएच्या नियमानुसार भारताची तक्रार फेटाळून लावण्यात आली. पहिल्या फेरीत आक्रमक खेळ करत सरिताने पुढील फेऱ्यांमध्येही जिना पार्क हिला पंचेस लगावले होते. नाकातून रक्त येऊ लागल्यानंतर जिना पार्क हिचा वेग मंदावला होता. संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवूनही सरिता हिला पराभूत घोषित करण्यात आले. त्यानंतर सरिताला भारताचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नाडेस आणि सहकारी बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने पाठिंबा दर्शवला होता.
‘‘कोरियाच्या बॉक्सरला ३-० असे विजयी करायचे, हे आधीपासूनच ठरले असण्याचे संकेत आम्हाला मिळाले. सरिता हीच विजयी ठरणार होती; पण पंचांना पैसे पोहोचले असावेत, अशी चर्चा येथे रंगली होती. १९८८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत असे घडले होते, त्याची पुनरावृत्ती येथे पाहायला मिळाली. बॉक्सिंगमधील परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. नव्या नियमांमुळे काहीही फरक पडलेला नाही,’’ असे फर्नाडेस यांनी सांगितले.