22 November 2019

News Flash

विंडीज दौऱ्यात विराटला भेटला खास चाहता, म्हणाला पुढचा विश्वचषक नक्की जिंक

बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वन-डे मालिकेतही भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर, कर्णधार विराट कोहलीला एक खास चाहता भेटायला आला होता. फिलीप्स असं या चाहत्याचं नाव असून तो वेस्ट इंडिजचा रहिवासी असला तरीही तो भारतीय संघाचा मोठा चाहता आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विराट आणि फिलीप्सच्या संभाषणाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

फिलीप्स हा अंध असला तरीही त्याच्याकडे भारतीय संघाच्या सर्व सामन्यांची खबरबात असते. यावेळी बोलत असताना फिलीप्सने विराट कोहलीच्या खेळाचं कौतुक केलं. “तू ज्या पद्धतीने जलदगती गोलंदाजांना फटके मारतोस ते मला आवडतं. तुझा खेळ आधीपेक्षा खूप सुधारला आहे. विश्वचषकात भारतीय संघ हरला तेव्हा तो धक्का मला सहन नव्हता झालेला. मला न्यूझीलंडचा संघ फारसा आवडत नाही, त्यामुळे पुढच्या विश्वचषकात चांगला खेळ करुन स्पर्धा जिंका”, असं म्हणत फिलीप्सने विराटला शुभेच्छा दिल्या.

तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ५९ धावांनी बाजी मारली. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या अखेरच्या वन-डे सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on August 13, 2019 11:00 am

Web Title: indian captain virat kohli meet special fan after t20i series watch video here psd 91
Just Now!
X