भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं टोपणनाव चिकू असल्याचं आता बहुतांश क्रिकेट रसिकांना माहिती आहे. मात्र हे नाव जगजाहीर कसं झालं याची कोणाला कल्पना नसेल. कोहलीचं हे नाव, जगजाहीर करण्यात महेंद्रसिंह धोनीचा मोठा वाटा आहे. अभिनेता अमिर खानसोबत एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान विराट कोहलीने हा किस्सा सांगितला.

अवश्य वाचा – कोहलीची खरी परीक्षा दक्षिण आफ्रिकेत – सौरव गांगुली

विराट कोहली १७ वर्षांखालील मुलांच्या स्थानिक स्पर्धेत दिल्लीकडून खेळत होता. त्यावेळी विराट कोहलीची हेअरस्टाईल ही त्याच्या मित्रांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. विराटने त्यावेळी अशापद्धतीने केस कापले होते, की त्याचे कान मोठे दिसायचे. यावरुन विराट एखाद्या सशासारखा दिसतो म्हणत त्याच्या मित्रांनी त्याला ‘चिकू’ हे नाव ठेवलं. आंतराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना विराटने आपले गुण मैदानात दाखवायला सुरुवात केली. एका सामन्यात क्षेत्ररक्षण लावत असताना धोनीने कोहलीला ‘चिकू’ या नावाने हाक मारली आणि यष्टींवर लावलेल्या माईकमुळे पुढे सोशल मीडियावर हे नाव लोकांना समजलं.

याव्यतिरिक्त विश्वचषक जिंकल्यानंतर आणि सचिनच्या निवृत्तीनंतर भारतीय संघातल्या वातावरणाबद्दलही विराट भरभरुन बोलला. २०११ साली श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर लवकर बाद झाल्यानंतर मलाही एका क्षणासाठी आपण हा सामना हरणार असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही आणि संघाच्या विजयात मी माझा मोलाचा हातभार लावू शकलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सचिनची जागा भारतीय क्रिकेटमध्ये कोणीही घेऊ शकणार नाही. सचिनशी होणाऱ्या तुलनेबद्दल प्रश्न विचारला असता विराट कोहलीने आपलं मत व्यक्त केलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका ४-१ ने जिंकल्यानंतर आता विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. यानंतर घरच्या मैदानावर भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा सामना करायचा आहे. ज्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

अवश्य वाचा – गोलंदाजांची भंबेरी उडवणारा रोहित गणितात कच्चा, नेटीझन्सनी घेतली फिरकी