पी.व्ही.सिंधू आणि आनंद पवार पराभूत
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा
आनंद पवार व पी. व्ही. सिंधू यांच्या एकेरीतील पराभवामुळे यजमान भारताचे इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले.  सिंधू या उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय खेळाडूला जागतिक क्रमवारीतील सहावी मानांकित खेळाडू राचनोक इन्तानोन हिने २१-१२, २१-६ असे सरळ दोन गेम्समध्ये पराभूत केले. हा सामना सिंधूने केवळ ३१ मिनिटांत गमावला. पवार याला पुरुषांच्या एकेरीत नववा मानांकित केनिची तागो याच्याकडून १६-२१, ११-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
अग्रमानांकित व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आल्यामुळे सिंधूच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पहिल्या गेममध्ये सिंधू हिने इन्तानोन हिला चांगली लढत दिली. थायलंडच्या इन्तानोन हिने पहिल्या गेममध्ये २-० अशी आघाडी घेत सुरुवात केली. तथापि सिंधूने सलग चार गुण घेत आघाडी मिळविली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. ९-९ अशा बरोबरीनंतर मात्र इन्तानोन हिने आघाडी कायम ठेवली. सिंधू हिला फारसा प्रभाव दाखविता आला नाही. इन्तानोन हिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. ही गेम तिने २१-१२ अशी सहज घेतली.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूचा बचाव सपशेल निष्प्रभ ठरला. इन्तानोनच्या वेगवान खेळापुढे तिची पुरती दमछाक झाली. इन्तानोनने १६-३ अशी भक्कम आघाडी घेत विजय निश्चित केला. इन्तानोन हिने केलेल्या चुकांचा फायदा घेत सिंधूने आणखी तीन गुण मिळविले. मात्र इन्तानोन हिने सलग पाच गुण घेत सामना जिंकला.
दरम्यान आनंद पवारला पराभवाला सामोरे जावे लागल्याने इंडिया ओपन स्पर्धेत भारताचे पुरुष गटातील आव्हान संपुष्टात आले. नवव्या मानांकित जपानच्या केनिची टागोने आनंद पवारवर २१-१६, २१-११ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये आनंदने जोरदार संघर्ष केला. प्रदीर्घ कालावधीच्या रॅली आणि नेटजवळून सुरेख खेळ करत आनंदने टागोला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. ६-६ बरोबरीनंतर टागोने आघाडी घेत आगेकूच केली. आनंदनेही काही गुण मिळवत पिछाडी भरुन काढली. १३-१२ अशी स्थिती असताना टागोने सलग पाच गुणांची कमाई करत भक्कम आघाडी घेतली. आनंदने त्याला प्रत्युत्तर देत सलग चार गुण पटकावले. मात्र त्यानंतर टागोने आपला खेळ उंचावत पुढचे दोन गुण मिळवत पहिल्या गेमवर कब्जा केला.
दुसऱ्या गेममध्येही ४-४ असा मुकाबला होता. मात्र यानंतर टागोने सलग पाच गुण पटकावत ९-४ अशी आघाडी घेतली. आनंदने जोरदार रॅलींवर भर देत काही गुण मिळवले. परंतु टागोने सातत्याने आगेकूच करत दुसऱ्या गेमसह सामना जिंकला.