चेन्नई : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) ९ फेब्रुवारीला महासंघाची निवडणूक घोषित केली आहे. अहमदाबाद येथे विशेष कार्यकारिणीची बैठक बोलावून निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती ‘एआयसीएफ’चे सचिव भरत सिंग चौहान यांनी दिली. निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरिजित पसायत यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

बुद्धिबळ महासंघाच्या या निवडणुकीत २०२० ते २०२३ या काळासाठी कार्यकारिणी समितीची नव्याने नियुक्ती होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यात एक अध्यक्ष, सहा उपाध्यक्ष, एक मानद सचिव, सहा संयुक्त सचिव आणि एक खजिनदार नियुक्त करण्यात येणार आहेत. बिहार, मेघालय, गुजरात, दिल्ली, चंडीगढ, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, नागालँड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या १३ राज्य बुद्धिबळ संघटनांना या निवडणुकीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे बुद्धिबळ महासंघाच्या डिसेंबर महिन्यात तीन बैठका पार पडल्यानंतर ९ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याच्या निष्कर्षांपर्यंत बुद्धिबळ महासंघ पोहोचला आहे.

सचिव आणि अध्यक्ष यांच्यातील वाद विकोपाला

भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष वेंकटरामा राजा आणि महासंघाचे सचिव चौहान यांच्यातील वाद गेले काही महिने चव्हाटय़ावर येत आहे. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये निवडणुकीच्या ठिकाणावरून वाद रंगला आहे. बुद्धिबळ महासंघाचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असताना अहमदाबाद येथे निवडणूक घेण्याची गरज काय, असा प्रश्न अध्यक्ष वेंकटरामा राजा यांच्या गटाकडून विचारला जात आहे. कोषाध्यक्ष किशोर बांदेकर हे वेंकटरामा राजा गटाचे असल्याने त्यांनी चेन्नईमध्ये मुख्य कार्यालय असताना त्याच ठिकाणी निवडणूक घेणे गरजेचे होते, असे म्हटले आहे. त्यावर महासंघाचे सचिव चौहान यांनी अहमदाबाद येथे निवडणूक घेण्यात काहीच गैर नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. इतकेच नाही तर चौहान हे कधीही बैठका बोलावतात आणि ९ फेब्रुवारीला त्यांनी बोलावलेली बैठक योग्य नाही, असा आरोप बांदेकर यांनी केला आहे.

कारण अध्यक्षांनी १० फेब्रुवारीला चेन्नई येथे निवडणूक घेण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात दिला होता, अशी माहितीही बांदेकर यांनी दिली.