08 August 2020

News Flash

देशातील नागरिकांमध्ये खेळांबाबत उदासीनता!

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची खंत

| July 12, 2020 02:32 am

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची खंत

नवी दिल्ली : भारतात क्रीडा संस्कृती रुजण्याची प्रकर्षांने गरज असून देशात खेळाचे ज्ञान खूपच कमी आहे. फक्त देशातच नाही तर संसदेतील काही खासदारांनाही क्रीडा क्षेत्राबाबत फारसे ज्ञान नाही, अशी खंत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.

‘‘खेळाविषयी भारतीय लोकांमध्ये ज्ञान कमी आहे. संसदेत माझ्या सहकाऱ्यांनादेखील खेळाविषयी फार ज्ञान नाही, हे मला दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. भारतात क्रिकेटविषयी सर्वाना माहिती आहे. ब्रिटिशांकडून हा खेळ भारतात आला आहे. अन्य खेळांचाबाबत फक्त ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकायचे असते इतकेच अनेकांना माहिती आहे,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

‘‘१५ वर्षीय ज्योती कुमारीने स्वत: सायकल चालवत करोनाच्या टाळेबंदीत तिच्या आजारी वडिलांना गुरग्राम येथून बिहार येथे १२०० किलोमीटरचे अंतर पार करून आणले. ज्योती कुमारी ही सायकलपटू नाही, मात्र तरीदेखील ती सायकलिंगमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देईल असे माझ्या काही संसदेतील सहकाऱ्यांनी म्हटले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाचे नियम असतात. मात्र त्याचे ज्ञान नसल्याचे यानिमित्ताने दिसले,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

उसेन बोल्टप्रमाणे धावू शकेल अशी उपमा कर्नाटकातील बैलगाडीसोबत धावलेला श्रीनिवास गौडाला सामाजिक माध्यमांवरून देण्यात आली होती. त्याबाबत रिजिजू म्हणाले की, ‘‘बैलगाडीच्या शर्यतीत श्रीनिवासने वेगात धावत गाठलेले अंतर पाहून तो बोल्टपेक्षा वेगात पळतो असे देशात म्हणायला लागते. मात्र जागतिक स्तरावरील धावण्याच्या शर्यतीसाठी धावपटू म्हणून श्रीनिवास तंदुरुस्त नाही. खेळाविषयीचे ज्ञान किती कमी आहे हे यातून दिसते,’’ याकडे रिजिजू यांनी लक्ष वेधले.

उच्चस्तरीय कार्यक्रम खेळासाठी गरजेचे – बिंद्रा

भारतात क्रीडा क्षेत्रातून विजेते घडवण्यासाठी उच्चस्तरीय कार्यक्रम गरजेचे आहेत, असे मत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने व्यक्त केले. अभिनव बिंद्राने खेळाडूंसाठी ऑनलाइन उच्चस्तरीय कार्यक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘‘विजेते खेळाडू घडवण्यासाठी त्या खेळाडूला प्रत्येक स्तरावर मार्गदर्शन गरजेचे असते. यासारख्या उच्चस्तरीय कार्यक्रमांमुळे देशातून विजेते खेळाडू घडायला मदत होणार आहे,’’ असे बिंद्राने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 2:32 am

Web Title: indian citizen indifference over sports culture says kiren rijiju zws 70
Next Stories
1 इंग्लंडचे विश्वविजेते फुटबॉलपटू जॅक चार्लटन यांचे निधन
2 कारवाईतील असमानता!
3 डाव मांडियेला : सुरक्षित खेळी
Just Now!
X