मुंबईत झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अंबाती रायडूचे कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. रायडूने चौथ्या स्थानावर फलंदाजी करताना ८१ चेंडूत १०० धावांची दमदार खेळी केली. चौथ्या सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला की, ‘अंबाती रायडूने मिळालेल्या संधीचे सोनं केले आहे. सामन्यातील परिस्थिती ओळखून तो फलंदाजी करतो. चौथ्या क्रमांकावर एक चांगला पर्याय मिळाल्यामुळे आम्ही आनंदात आहे. रायडूला २०१९ च्या विश्वचषकापर्यंत संधी दिली जाऊ शकते.’

‘या शतकी खेळीने रायडूने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर आशा करतो की वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबत चिंता मिटली आहे. तणावाच्या परिस्थितीत रायडू चांगली कामगिरी करतो. त्याला आम्ही बऱ्याच वर्षांपासून ओळखतो आणि तो चांगली खेळी खेळू शकतो,’ असेही विराट म्हणाला.

वेस्ट इंडिजविरोधात विजयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या खलील अहमदचेही विराटने कौतुक केले. खलीलने पाच षटकांत १३ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. खलीलची स्तुती करताना विराट म्हणाला, ‘खलील योग्य टप्यावर गोलंदाजी करत होता. तो दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करत होता. त्यामुळे फलंदाजाला खेळताना अडचण येत होती.’

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघासमोर चौथ्या क्रमांक हा चिंतेचा विषय होता. मात्र, या मालिकेत रायडूची कामगिरी आणि विराट कोहलीने केलेली स्तुती पाहता वर्ल्डकपमध्ये रायडूचे स्थान पक्के समजले जात आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित आणि रायडूने चौथ्या विकेटसाठी २११ धावांची भागिदारी करत संघाला मोठ्या धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चौथ्या स्थानावर भारताने १२ खेळाडूंना संधी दिली. मात्र, प्रत्येकाला अपयश आले.

चौथ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजला भारताकडून २२४ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या ३७७ धावांमध्ये रोहित शर्माने १६२ तर रायडूने १०० धावा ठोकल्या. या विजयाबरोबर भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ३७८ धावांचा पाठलाग करताना विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. हा भारताचा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.