|| प्रशांत केणी

कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने निवड प्रक्रियेआधारे रवी शास्त्री यांचीच पुन्हा भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. ही प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासूनच शास्त्री यांची निवड अपेक्षितच मानली जात होती. त्यामुळे या निवड प्रक्रियेवर ‘औपचारिकता’ असल्याचा शिक्का बसणेही स्वाभाविक होते. परंतु कर्णधार विराट कोहलीची पसंती, सुसंवादकौशल्य आणि संघातील समस्यांची जाण हे मुद्दे शास्त्री यांच्या निवडीसाठी अनुकूल ठरले.

शास्त्री यांनी ऑगस्ट २०१४ ते मार्च २०१६ या कठीण कालखंडात संघ संचालकाची जबाबदारी सांभाळली होती. याच काळात महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करून, फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. याचप्रमाणे कोहली-धोनी मतभेदाच्या चर्चाही ऐरणीवर होत्या. मग जानेवारी २०१७ला धोनीने मर्यादित षटकांचेही कर्णधारपद सोडले. भारतीय क्रिकेटच्या नेतृत्वाची सूत्रे धोनीकडून कोहलीकडे या काळात संक्रमित झाली. कोहलीचे वर्चस्व वाढत गेले. यासंदर्भात भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही भाष्य केले होते की, ‘‘कोहली कुणाचेच ऐकत नाही. त्याच्यासमोर कुणी बोलूही शकत नाही.’’ इतके त्याचे दडपण होते. जून २०१६ ते जून २०१७ या कालखंडात अनिल कुंबळे भारताचे प्रशिक्षक झाले. परंतु कडक शिस्तीचे कुंबळे कोहलीला रुचले नाहीत. कर्णधाराशी तीव्र मतभेद झाल्यामुळे कुंबळे यांना पद सोडावे लागले. शिस्तीचे दडपण नको असलेल्या आक्रमक वृत्तीच्या कोहलीला भारतीय संघासाठी मोकळ्या विचारसरणीचा मार्गदर्शक हवा होता. त्यामुळेच जुलै २०१७मध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा शास्त्री यांच्याकडे सोपवण्यात आली. आतासुद्धा पुन्हा शास्त्रीच प्रशिक्षकपदावर कायम का राहिले, याचे एक प्रमुख उत्तर ‘कर्णधाराची अनुकूलता’ हे आहे.

निवड प्रक्रियेसाठी समितीने मार्गदर्शनाचे तंत्र, प्रशिक्षणाचा अनुभव, प्रशिक्षणातील यश, सुसंवाद आणि आधुनिक प्रशिक्षण पद्धतीची माहिती असे पाच घटक प्रमाण मानले. मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असलेल्या अन्य प्रशिक्षकांशी तुलना करताना ट्वेन्टी-२० लीगमधील मार्गदर्शनाचा अनुभव वगळल्यास भारताचे प्रतिनिधित्व आणि प्रशिक्षकपदाचा अनुभव शास्त्री यांच्यासाठी सरस ठरला. शास्त्री यांच्या संघ संचालक आणि मुख्य प्रशिक्षकपदाच्या आतापर्यंतच्या कालखंडात भारताने कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये अग्रस्थानापर्यंत झेप घेतली. जुलै २०१७पासून भारताने सातपैकी पाच कसोटी मालिका जिंकल्या. यापैकी ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम हा सर्वात महत्त्वाचा आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०१५ आणि यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसह २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. या कामगिरीचे मूल्यांकन करताना कपिल म्हणाले की, ‘‘जर कोणताही प्रशिक्षक, कोणत्याही संघाला विश्वविजेतेपद जिंकून देऊ शकले नाही, तर त्यांची हकालपट्टी करावी का? आम्ही प्रशिक्षकाच्या एकंदर कार्यकाळाचा आढावा घेतला.’’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांशी संवाद आणि येथील क्रिकेटचा ढाचा त्यांना पूर्णत: ज्ञात आहे. संघातील एकोपा कायम राखतानाच खेळाडूंशी प्रभावी संवाद हे शास्त्री यांचे बलस्थान ठरले. अमेरिका-वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माशी मतभेदासंदर्भात कोहलीला प्रश्न विचारला असता, शास्त्री यांनी खडसावले की, ‘‘संघात मतभेद, वाद किंवा गटबाजी असती तर भारताला यशस्वी वाटचाल करता आली नसती!’’

खेळाडूंची कामगिरी उंचावण्यात शास्त्री यांचा हातखंडा आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याच्या पत्नीने जेव्हा कायदेशीर प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या आव्हानात्मक कालखंडात ते शमीच्या पाठीशी राहिले. सूर हरवल्यामुळे चेतेश्वर पुजाराला भारताच्या कसोटी संघातील स्थान टिकवणे कठीण जात होते. परंतु तिसऱ्या क्रमांकावरील या फलंदाजाला खंबीरपणे पुन्हा संघात स्थिरावण्यासाठी शास्त्री यांनी साहाय्य केले. हार्दिक आणि लोकेश राहुल वादग्रस्त वक्वत्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यासंदर्भातील शिक्षा झाल्यानंतर त्यांची कामगिरी पुन्हा उंचावण्यात शास्त्री यांचे पाठबळ महत्त्वाचे होते. धोनीची कारकीर्द अस्ताला जात असताना ऋषभ पंतला तयार करणे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला कसोटी क्रिकेटमध्ये आणणे आणि पंडय़ाची परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू होण्याकडे वाटचाल, यात शास्त्री यांची भूमिका मोलाची आहे. शास्त्री यांच्या कालखंडात अनेक युवा खेळाडूंना योग्य संधी मिळाली. कर्णधार आणि निवड समितीच्या समन्वयाने शास्त्री यांनी ४०हून अधिक युवा खेळाडूंना अजमावले आहे.

तूर्तास, २०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत अनेक आव्हाने भारतीय संघासमोर आहेत. ‘बीसीसीआय’च्या घटनेनुसार पार पडलेल्या निवड प्रक्रियेंतर्गत सर्वोत्तम ठरल्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड झालेल्या शास्त्री यांना शुभेच्छा!

prashant.keni@expressindia.com