आयुष्यातील संघर्षांनंतरही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा ज्याच्या पुरेशा प्रमाणात भागत नाही, तो म्हणजे गरीब. या व्याख्येचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेत क्रिकेटपटूला गरीब ठरवणे तसे कठीणच. निवृत्तीनंतरही मार्गदर्शन, समालोचन, जाहिराती, स्तंभलेखन, चर्चा आदी माध्यमांतून क्रिकेटपटूची आर्थिक रसद सुरू असते. अशा सुप्रस्थापित क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या रवी शास्त्री यांची ताजी टिप्पणी सध्या चर्चेत आहे. ‘देशातील सर्वात श्रीमंत संघटना’ असा लौकिक असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशातील क्रिकेटपटूंना सन्मान म्हणून वेतन नव्हे, तर शेंगा देते, असे भाष्य शास्त्रीजींनी केले. शास्त्रींप्रमाणेच भारताचा संघनायक विराट कोहलीसुद्धा ‘हेचि फळ काय मम तपाला’ अशा आवेशात गळा काढून दाद मागतो आहे. यानिमित्ताने भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या गरिबीचा साक्षात्कार होत असला, तरी ही गरिबी गडगंजच म्हणायला हवी. कशी ते पाहू..

पण त्याआधी, आक्रमक नेतृत्व आणि फलंदाजीच्या बळावर भारतीय क्रिकेटमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा अन्यायग्रस्त क्रिकेटपटूंचा कैवारी कोहली काय म्हणतो ते समजून घेऊ. तो तावातावाने म्हणतोय, अ-श्रेणीतील क्रिकेटपटूंना किमान पाच कोटींचे वेतन मिळायला हवे. भारतीय क्रिकेटची नेहमीच ऑस्ट्रेलियाशी तुलना होते. भारताची कामगिरी अगदी त्यांच्याप्रमाणेच दिमाखात होते. त्यांचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ सुमारे पावणेसात कोटी रुपये वेतन मिळवतो, तर अन्य १९ क्रिकेटपटूंना पावणेसहा कोटी वेतन मिळते. त्या तुलनेत कोहलीला मिळणारे दोन कोटी म्हणजे तुटपुंजेच म्हणावे लागतील; पण ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची तुलना झाल्यास या आकडेवारीत फारसा फरक नसल्याचे स्पष्ट होते. ऑस्ट्रेलियाचा अव्वल गोल्फपटू जेसन डेचे वार्षिक वेतन हे ९७ कोटींच्या आसपास जाते. त्यामुळे तेथील अव्वल क्रिकेटपटू हा अन्य खेळांच्या तुलनेत गरीबच म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच इंग्लंडच्या अव्वल क्रिकेटपटूंना साडेपाच कोटी रुपये वार्षिक वेतन मिळते.

कोहली आणि स्मिथप्रमाणेच ए बी डी’व्हिलियर्स जगभरातील गोलंदाजांवर अधिराज्य गाजवतो. मात्र त्याचे वार्षिक वेतन हे ७७ लाख रुपये आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलची जादू नेहमीच जाणवते. मात्र त्याला फक्त एक लाख १२ रुपये वर्षांचे वेतन मिळते. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला जवळपास ९२ लाख रुपये वेतन मिळते. श्रीलंकेच्या अव्वल क्रिकेटपटूंना सुमारे ८० लाख रुपये मानधन मिळते, तर पाकिस्तानमधील अव्वल श्रेणीतील क्रिकेटपटू वर्षांला ६० लाख वेतन मिळवतो. वार्षिक वेतनांचा विचार करताना त्यामुळे तेथील अर्थकारण विचारात धरणे आवश्यक असते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका यांच्या खेळाडूंचे मानधन हे आकडय़ांमध्ये अल्प दिसते.

जगभरातील क्रिकेटपटूंच्या सामनेनिहाय मानधनात मात्र भारतीय संघ अव्वल आहे. भारतीय खेळाडूंना प्रत्येक कसोटीचे १५ लाख, तर प्रत्येक एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्याचे अनुक्रमे ६ आणि ३ लाख इतके मानधन मिळते. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला कसोटीचे साडेनऊ लाख, एकदिवसीय सामन्याचे ४ लाख आणि ट्वेन्टी-२० सामन्याचे २ लाख मानधन मिळते. त्या खालोखाल इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा क्रमांक लागतो. पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका या देशांमधील क्रिकेटपटूंना तुरळक मानधन मिळते.

क्रिकेटपटूचा उदरनिर्वाह आता फक्त देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या सामन्यांतूनच होत नाही. ते दिवस केव्हाच सरले आहेत. स्थानिक क्रिकेट सामन्यांचे मानधन, इंडियन प्रीमियर लीग, बांगलादेश प्रीमियर लीग, पाकिस्तान प्रीमियर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग आदी लीगचा बारमाही सुगीचा हंगाम सुरू आहे. याशिवाय जाहिराती, ब्रँडिंग यांसारख्या बाजारपेठांमध्ये क्रिकेटपटूंचा भाव हा कायम वरचा मानला जातो.

क्रिकेटगरिबांचा महानायक विराट हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या पंक्तीत अव्वल स्थानावर आहे, या सत्याकडे मात्र डोळेझाक करता येणार नाही. वेतन हा मुद्दा बाजूला ठेवल्यास विराटची सर्व माध्यमांतून वार्षिक कमाई ही एक अब्ज ७२ कोटी ८८ लाख ६३ हजार इतकी आहे, तर स्मिथची एकूण कमाई फक्त १६ कोटी ६ लाख ७५ हजार आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा भाग असूनही विराट हा स्मिथपेक्षा चारपट किंवा त्याहूनही अधिकच पैसे कमवतो. मग गरीब कोण? या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळते.

वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचा वेतन-मानधनाच्या प्रश्नावर आपल्या क्रिकेट मंडळाशी नेहमीच झगडा चालू असतो. त्यांच्या गेलचे वेतन पाहिल्यास विराट-शास्त्रीच्या गरिबीच्या व्याख्येनुसार तो अतिगरीब ठरेल. मात्र त्यांचे अनेक क्रिकेटपटू विविध लीग आणि अन्य माध्यमांतून उत्तम उत्पन्न कमवतात. श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेला गेलची वर्षांची कमाई ४८ कोटी २० लाख २५ हजार इतकी आहे. याचप्रमाणे चौथ्या स्थानावरील ए बी डी व्हिलियर्सची कमाई ३५ कोटी ३४ लाख ८५ हजार रुपये आहे. या सर्व खेळाडूंच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत हा भारत म्हणजेच येथील आयपीएल आणि जाहिराती हा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर भारताशी ‘अर्थसंबंध’ असलेल्या स्मिथ, ब्रॅड हॉगच्या प्रतिक्रिया कशा बदलतात, ते क्रिकेटविश्वाने पाहिले आहे.

विंडीजप्रमाणेच श्रीलंका, पाकिस्तान या देशांमधील क्रिकेटपटूंचाही आर्थिक संघर्ष नेहमीच सुरू असतो. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी तर आपले अर्थकारण सुधारावे, या हेतूने कोलपॅक कराराचा आधार घेत इंग्लंडचा मार्ग पत्करला आहे. कायले अ‍ॅबॉट, रिली रॉसोऊ आणि डेव्हिड विसी यांच्याप्रमाणे आफ्रिकेतील ६०हून अधिक खेळाडू सध्या इंग्लंडच्या आश्रयाला आहेत.

वेतन किंवा कमाई या गोष्टीला समाधानकारकतेची मर्यादा नसते. कारण त्यावर कोणत्याही व्यक्तीचे स्वप्न, समृद्धी अवलंबून असते. त्यामुळेच वेतनासाठी भांडणारा विराटसुद्धा त्यांचेच प्रतिनिधित्व करतो. खरा अन्याय तर इमानेइतबारे कसोटी क्रिकेटमध्ये नांगर टाकून फलंदाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजारावर होतो आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू न शकणाऱ्या पुजाराकडे अन्य माध्यमांतून मानधनाचेही मार्ग नाहीत. त्यामुळे पुजाराप्रमाणे खरे गरीब क्रिकेटपटू कोण, याचीसुद्धा चाचपणी होणे आवश्यक आहे.

01

02

03

04

05

06

– प्रशांत केणी

prashant.keni@expressindia.com