गुवाहाटीतील दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयानंतर हॉटेलवर परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक झाल्यानंतर काल संध्याकाळी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने याबद्दल ऑस्ट्रेलियन संघाची माफी मागीतली. काही वेड्या क्रिकेट चाहत्यांमुळे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांना मान शर्मेने खाली घालवी लागल्यानंतर काल संध्याकाळी अनेक क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलियन संघ थांबलेल्या ‘रॅडीसन ब्लू हॉटेल’च्या बाहेर ‘सॉरी’चे मोठे पोस्टर्स घेऊन उभे राहिल्याचे चित्र दिसले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना गुवहाटीमधील बुसापार मैदानावर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर सफाईदार विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आपल्या हॉटेलवर परत येत असताना त्यांच्या बसच्या उजव्या बाजूने दगडफेक झाली. याबद्दल अॅरॉन फिंचने ट्विट करून माहिती दिली होती. या हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त करतानाच हल्लेखोर मानसिकतेच्या क्रिकेट चाहत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

कालच्या घटनेने हदरून गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला आज सकाळी अस्सल क्रिकेटप्रेमींनी एक सुखद धक्का दिला. अनेक क्रिकेट चाहते ‘रॅडीसन ब्लू हॉटेल’च्या बाहेरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंने सॉरीचे मोठे फलक हातात घेऊन ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे काल झालेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त करत होते. या पोस्टर्समध्ये ‘सॉरी ऑसिस’, ‘सॉरी टीम ऑस्ट्रेलिया’, ‘सॉरी बीसीसीआय’ यासारखे छोटे संदेश लिहीण्यात आले होते. त्याचबरोबर इतरही काही माफीनामे चाहत्यांनी कागदावर लिहून आणलेले. काही वेड्या लोकांनी ऑस्ट्रेलियन संघावर दगडफेक केली ही आमच्यासाठी खूप लज्जास्पद बाब आहे असेही एका पोस्टवर लिहीण्यात आले होते. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन झालेल्या कृत्याबद्दल दिलगीरी व्यक्त केल्याबद्दल नेटकऱ्यांनी भारतातील खऱ्या क्रिकेट रसिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या गुवहाटीमधील क्रिकेट चाहत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

‘क्रिकेट बॉलच्या आकाराची वस्तू ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर फेकण्यात आल्याची शक्यता आहे’ या शब्दात भारतीय क्रिकेट बोर्डाने या संदर्भात प्रतिक्रीया दिली आहे. या घटनेनंतर हैदराबाद येथील अंतिम टी-२० सामन्याच्या ठिकाणी तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडू राहत असणाऱ्या हॉटेलच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिकेतील अंतीम टी-२० सामना हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे.