क्रिकेटच्या मैदानात रवी शास्त्री नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाले आहेत. मागील वर्षी प्रशिक्षक पदाची संधी हुकल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात अखेर बीसीसीआयने त्यांच्याकडे भारतीय प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. मुंबईत जन्मलेल्या रवी शास्त्री यांना लहानपणापासूनच क्रिकेटची क्रेझ होती. डॉन बास्को शाळेमधून त्यांनी क्रिकेटचा आपला प्रवास सुरु केला.  १९७७ साली डॉन बास्को शाळेने रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली शालेय स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले. ज्युनीअर कॉलेजमध्ये शिकत असताना शास्त्री यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवले. सध्याच्या घडीला षटकारांचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगपूर्वीच रवी शास्त्री यांनी ६ चेंडूत ६ षटकार खेचण्याचा पराक्रम केलाय. तब्बल १६ वर्षानंतर रणजी करंडक स्पर्धेत मुंबई आणि बडोद्यामधील सामन्यादरम्यान रवी शास्त्री यांनी ६ षटकार ठोकून वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. बडोद्याचा फिरकीपटू तिलकराजच्या गोलंदाजीवर रवी शास्त्रींनी हा करिश्मा केला होता.

२१ फेब्रुवारी १९८१ मध्ये रवी शास्री यांनी न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.  त्यानंतर तब्बल आठ महिन्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांना एकदिवसीय संघात संधी मिळाली. १९८३ साली कपील देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिला विश्वचषक जिंकला. यावेळी रवी शास्त्री  भारतीय संघाचे सदस्य होते. शास्री यांच्या कारिकिर्दीतील हा सर्वोच्च क्षण होता. त्यांनी ८० कसोटीत ११ शतके आणि आणि १२ अर्धशतकांच्या जोरावर ३८३० धावा केल्या आहेत. तर एकदिवसीयमध्ये १५० सामन्यात त्यांनी ४ शतके आणि १८ अर्धशतकाच्या मदतीने ३१०८ एवढ्या धावा केल्या आहेत. फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही त्यांनी अनुक्रमे ३६ आणि ४० वेळा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर रवी शास्त्री  यांनी समालोचनाकडे वळले. रवी शास्त्री यांना गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत समालोचन करण्यासाठी सर्वाधिक मानधन मिळाले होते. या मालिकेसाठी त्यांना तब्बल ५६.९३ लाख इतके मानधन देण्यात आले होते. ऑगस्ट २०१४ ते जून २०१६ या काळात रवी शास्री यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. एकूणच त्यांचा क्रिकेटच्या मैदानातील हा अनुभव भारतीय संघासाठी कितपत लाभदायक ठरेल, हे येणारा काळच ठरवेल.