करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जगभरातील क्रीडा विश्वालाही बसला आहे. बीसीसीआयसह सर्व देशांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. मात्र खेळावर अवलंबून असलेल्या लोकांचं आयुष्य आणि अर्थव्यवस्थेचा विचार करत आयसीसी वर्षाअखेरीस प्रेक्षकांविना पुन्हा एकदा क्रिकेटचे सामने सुरु करण्याचा विचारात आहे. वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा न झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार भारतीय संघाला प्रवासाची विशेष परवानगी देणार असल्याचं समजतंय. बीसीसीआयनेही हा दौरा खेळण्याची तयारी दाखवली आहे. मात्र याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दोन आठवडे स्वतःला क्वारंटाईन करेल असंही बीसीसीआयने स्पष्ट केलंय. त्यामुळे या दौऱ्याआधी भारतीय संघातील खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबीर आयोजित करण्याचा विचार BCCI करत आहे.

बीसीसीआयने यावर अद्याप अधिकृत निर्णय घेतलेला नसला तरीही रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी मागणी केल्यास खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबीराचं आयोजन करण्यास बीसीसीआय तयार असल्याचं वृत्त Sportskeeda या संकेतस्थळाने दिलं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या शिबीराचा विचार केला जाऊ शकतो असंही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलंय. अनिल कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना त्यांनी अशा पद्धतीच्या राष्ट्रीय शिबीराची मागणी केली होती. मात्र या काळात धोनीने वन-डे संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत विराटकडे सूत्र सोपवली. यानंतर राष्ट्रीय शिबीराची संकल्पना बारगळली होती.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सहाय्याने बंद पडलेले सामने पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. देशातली सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे. याचसाठी स्पर्धा रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी सुरु आहे. याचसोबत वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषकही प्रेक्षकांविना खेळण्यास बहुतांश संघाचा नकार आहे, त्यामुळे या विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.