आंतरराष्ट्रीय सामना दोन-तीन दिवसांवर आला असताना खेळाडू मैदानावर जाऊन सराव करतात. हे सारे आपल्यासाठीही नित्याचेच. पण या वेळी मात्र भारतीय क्रिकेट संघाने सराव केला, पण हा सराव मैदानावर नाही तर दूरचित्रवाणी संचावर. भारतीय संघ चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळण्यासाठी दाखल झाला खरा. पण वर्दा चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोबाइलही सुरू नाहीत आणि मैदानही अजून सुस्थितीत आलेले नाही. त्यामुळे भारतीय संघातील काही खेळाडूंनी दूरचित्रवाणीवर फुटबॉल ‘गेम्स’ खेळत दिवस सत्कारणी लावला.

भारतीय संघ सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीच चेन्नईत दाखल झाला. पण वर्दा चक्रीवादळामुळे मैदानाची स्थिती चांगली नव्हती. खेळपट्टी आणि मैदानालाही या चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यामुळे भारतीय संघाला मैदानात जाऊन सराव करता येणार नव्हता. त्यामुळे भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली, करुण नायर, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल यांनी दूरचित्रवाणीवर ‘गेम्स’ खेळायला सुरुवात केली. आर. अश्विन या वेळी या चौघांच्या खेळाचा आनंद लुटत होता.