भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यात मेलबर्न येथे केलेल्या शतकानंतर अजिंक्य रहाणेच्या धावांकडे संजय मांजरेकर यांनी लक्ष वेधलं आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अजिंक्य रहाणेने ११२ धावा करत ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका बरोबरीत आणली होती. मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणेने २७*, २२, ४, ३७, २४, १ आणि ० धावा केल्या आहेत. यामध्ये इंग्लंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्याचाही समावेश आहे.

संजय मांजरेकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “कॅप्टन रहाणेबाबत मला एक समस्या आहे ती म्हणजे फलंदाज रहाणे. मेलबर्नमधील शतकानंतरची धावसंख्या २७*, २२, ४, ३७, २४, १ आणि ० अशी आहे. शतक ठोकल्यानंतर दर्जात्मक खेळाडू आपला फॉर्म कायम ठेवतात आणि फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंवरील दबाव आपल्या खांद्यावर घेतात”.

विराट कोहली पितृत्व रजेवर गेल्यानंतर अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व केलं. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळलेल्या तीनपैकी दोन सामने भारतीय संघाने जिंकली आणि २-१ ने कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला.

दुसरीकडे अजिंक्य रहाणे पाचव्या दिवशी जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाल्याच्या प्रश्नावर बोलताना विराटने म्हटलं आहे की, “मीदेखील अनेकदा बोल्ड झालो आहे. जर तुम्ही खोदून काही काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या हाती काही लागणार नाही. मी अनेकदा सांगितलं आहे की, पुजारासोबत अजिंक्य आमचा महत्वाचा कसोटी फलंदाज आहे. मेलबर्नबद्दल बोलत असाल तर जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तो मैदानावर उभा राहिला. आम्ही ऑस्ट्रेलियात मालिका जिंकलो हे वास्तव आहे”.