भारतीय क्रिकेट संघ पुढच्या वर्षी बांगलादेशला भेट देणार आहे. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय संघाला बांगलादेश दौर्‍यावर दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. २०१९मध्ये या दोन्ही देशांमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली गेली होती. यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्ट सामन्याचादेखील समावेश होता.

ESPN क्रिकइन्फोने दिलेल्या अहवालात असेही म्हटले आहे, की बांगलादेश क्रिकेट बोर्ड २०२१ ते २०२३ दरम्यान होणाऱ्या मालिकेचे प्रसारण हक्क विकत आहे. काही मोठे संघ बांगलादेशात जाणार आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलिया संघाचे नाव आहे. ऑस्ट्रेलियन संघाला तेथे मर्यादित षटकांच्या मालिका खेळाव्या लागतील.

इंग्लंडच्या संघालाही बांगलादेशमध्ये टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठीही जावे लागणार आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघदेखील जानेवारी २०२३ मध्ये बांगलादेश दौर्‍यावर जाणार आहेत. शेवटच्या वेळी भारतीय संघ बांगलादेशात खेळायला गेला होता, तेव्हा त्यांची कामगिरी काही खास नव्हती, बांगलादेशने वनडे मालिकेत भारतीय संघाचा पराभव केला होता.

बांगलादेशची टीम सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी तयारी करीत आहे. श्रीलंकेचा संघ बांगलादेशमध्येही पोहोचला आहे.