भारतीय क्रिकेट संघ आज विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने जिंकत पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंड संघाशी भिडणार आहे. दुसरीकडे भारतीय संघदेखील सुरुवातीला दक्षिण आफ्रिका आणि नंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अपराजित राहिला आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरोधात मैदानात उतरण्यासाठी सज्ज असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने वर्ल्ड कपसंबंधी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. १४ जुलै रोजी आपल्याला वर्ल्ड कप उचलून घ्यायचा आहे असं आपलं स्वप्न असल्याचं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे.

आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पांड्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय संघासाठी खेळणं माझा श्वास असून, हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे असं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे. पुढच्या काही आठवड्यांसाठी हार्दिक पांड्याने आपला प्लॅनदेखील जाहीर केला आहे. हा प्लॅन म्हणजे वर्ल्ड कप जिंकणे.

‘भारतीय संघासाठी खेळणं माझ्यासाठी सर्वस्व आहे, हेच माझं आयुष्य आहे. मी एक असा खेळाडू आहे ज्याचं त्याच्या खेळावर प्रचंड प्रेम असून चिकाटीने खेळतो. मला नवनवीन आव्हानं आवडतात. मी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वर्ल्ड कपसाठी तयारी करत असून आता ती वेळ आली आहे’, असं हार्दिक पांड्याने म्हटलं आहे.

भारताने २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्याची रात्र आजही आपल्या लक्षात असल्याचं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे. जेव्हा कधी तो क्षण आठवतो तेव्हा आपल्या अंगावर काटा उभा राहतो असं हार्दिक पांड्या सांगतो.

‘१४ जुलै रोजी वर्ल्ड कप माझ्या हाती हवा आहे. आजही जेव्हा मी २०११ वर्ल्ड कपची आठवण काढतो, अंगावर काटा येतो. २०१९ वर्ल्ड कपसाठी खेळमं माझं स्वप्न होतं. संघातील इतर खेळाडू माझ्या भावासारखे आहेत. आता माझा प्लॅन साधा आणि सरळ आहे तो म्हणजे वर्ल्ड कप जिंकणे. मी माझं स्वप्न पूर्ण करेन अशी मला आशा आहे’, असं हार्दिक पांड्याने म्हटलं आहे. मुलाखतीच्या शेवटी हार्दिक पांड्याला त्याच्यावर काही दबाव आहे का विचारलं असता कसलाही दबाव नसल्याचं त्याने सांगितलं आहे.