भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या जिवाला धोका असून त्यांच्यावर लवकरच दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशा आशयाचा ‘ई-मेल’ पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आल्याने क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली. मात्र वेस्ट इंडिजमध्ये असलेल्या भारतीय संघाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे, परंतु अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

शुक्रवार, १६ ऑगस्ट रोजी ‘पीसीबी’ला एका अनधिकृत ‘ई-मेल’ खात्यावरून हा संदेश आल्यानंतर त्यांनी २४ तासांच्या आतच ‘बीसीसीआय’ व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) याविषयी कळवले. परंतु चौकशी केल्यानंतर ‘बीसीसीआय’ने या सर्व अफवांना धुडकावून लावले आहे.

‘‘गेले काही दिवस समाजमाध्यमांवर भारतीय क्रिकेटपटूंच्या जिवाला धोका असल्याची चर्चा रंगत आहे. परंतु अशा प्रकारचा कोणताही धोका भारतीय संघाला नसून खेळाडूंच्या संर्पूण सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ सक्षम आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. भारतीय संघ तूर्तास वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून २२ ऑगस्टपासून उभय संघांतील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.