जगभरातील क्रिकेट मंडळे क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात व्यस्त आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यात आघाडी घेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात करून दिली आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षण शिबीर ऑगस्ट महिन्याच्या आधी सुरू होणार नसल्याचे BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले होते. पण आता करारबद्ध खेळाडूंना सोबत घेऊन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याचा विचार BCCI कडून केला जात असून हे शिबीर परदेशात भरवले जाण्याची शक्यता आहे.

लॉकडाउन सुरू झाल्यापासून BCCIने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय क्रिकेटपटू स्वत: वैयक्तिक पातळीवर सराव करत आहे. पण खेळाडूंचे एकत्रितपणे प्रशिक्षण कधी सुरू केले जाणार? याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, BCCIशी कराराबद्ध असणाऱ्या खेळाडूंना सोबत घेऊन सुमारे ६ आठवड्यांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी दुबईला जाण्याचा विचार BCCI करत आहे. याबाबत अंतिम निर्णय १७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल असे सांगितले जात आहे.

BCCI सध्या भारतीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने एक योजना (Standard Operating Procedures) आखत आहे. दुबईमध्ये सहा आठवड्यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबाबतची यादी भारतीय संघ व्यवस्थापनाने BCCIला आधीच दिली असल्याचीही माहिती आहे.

भारतीय संघाची लॉकडाउननंतरची पहिली मालिका कोणती असेल? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे IPL 2020 स्पर्धेने भारतात क्रिकेटची सुरूवात होऊ शकते असे बोलले जात आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात IPL 2020 ही स्पर्धा आयोजित करण्याचा विचार BCCIकडून केला जात आहे. मात्र ICCकडून T20 World Cup 2020बद्दल अधिकृत माहिती येत नाहीत तोवर BCCIला वाट पाहावी लागणार आहे.