निवृत्त न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट संघटनेचे उत्तम प्रशासन चालवावे, याकरिता मी त्यांना शुभेच्छा देतो, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी करण्यात आलेले बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र बीसीसीआय ही देशातील सर्वोत्तम कारभार चालणारी संघटना आहे, असे ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले.

‘‘माझ्यासाठी हा व्यक्तिगत संघर्ष नव्हता. क्रिकेट संघटनेच्या स्वायत्ततेसाठी हा लढा होता. प्रत्येक नागरिकाप्रमाणे मी सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो. जर निवृत्त न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआयचा कारभार सुरळीत चालेल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना वाटत असेल, तर मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेटचा उत्कर्ष होईल, याची मला खात्री आहे,’’ असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांवर व्हिडीओद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मे २०१६मध्ये अध्यक्षपद सांभाळण्यापूर्वी ठाकूर बीसीसीआयचे संयुक्त सचिव होते. भाजपचे खासदार असणारे ठाकूर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनची धुरा सांभाळत आहेत.

‘‘भारतीय क्रिकेटचा कारभार पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल मला स्वत:चा अभिमान वाटतो. खेळातील प्रशासन आणि विकास या बाबतीत भारतीय क्रिकेटने गेली अनेक वष्रे नेटाने कार्य केले आहे. बीसीसीआय ही देशातील सर्वोत्तम व्यवस्थापन असलेली संघटना आहे. राज्य संघटनांच्या कारभारावरसुद्धा बीसीसीआयचे पूर्णत: नियंत्रण आहे. अन्य देशांपेक्षा भारतात अधिक दर्जेदार खेळाडू आहेत,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.