23 February 2019

News Flash

सोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज

वाडेकरांच्या बॅटचा प्रसाद प्रसन्ना, चंद्रशेखर यांनाही वेळोवेळी मिळाला.

अजित वाडेकर

|| संजय चिटणीस

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीकडे मागे वळून पाहताना रुईया कॉलेज ते कसोटी क्रिकेट असा त्यांचा यशस्वी प्रवास डोळ्यांसमोर येतो. रुईया कॉलेजतर्फे आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा, शिवाजी पार्क जिमखान्याकडून कांगा लीग, स्टेट बँकेकडून टाइम्स शिल्ड, मुंबईतर्फे  रणजी स्पर्धा, पश्चिम विभागातर्फे  दुलीप स्पर्धा व शेवटी कसोटी क्रिकेट असे त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीचे टप्पे होते आणि प्रत्येक टप्प्यावर आपली गुणवत्ता सिद्ध करीत त्यांनी कसोटी क्रिकेटचे दरवाजे ठोठावले. जवळचा मार्ग नव्हता. वाडेकरांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा त्यांची पंचविशी उलटून गेली होती. त्यामुळेच कदाचित पाच-सहा वर्षांपूर्वी प्रतिष्ठेचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यावर ‘‘फार लवकर हा पुरस्कार मिळाला, याचा आनंद होत आहे,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गारफिल्ड सोबर्सच्या नेतृत्वाखाली आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध वाडेकर यांनी १९६६-६७च्या क्रिकेट मोसमात ब्रेबॉर्न स्टेडियमवर कसोटी पदार्पण केले. त्या सामन्याला मी हजर होतो. कर्णधार पतौडी बाद झाल्यावर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी वाडेकर जेव्हा मैदानात उतरले, तेव्हा या ‘बॉम्बे बॉय’चे प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्याआधी रणजी व दुलीप स्पर्धेमध्ये वाडेकर यांनी धावांचा रतीब टाकल्याने विशेषत: मुंबईच्या प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या. त्यातही त्या काळी नॉर्थ स्टँडमध्ये दर्दी प्रेक्षक असायचे. बरेचसे क्लब क्रिकेट खेळणारे; पण वाडेकर यांच्या ८ धावा झाल्या असताना सोबर्सच्या गोलंदाजीवर लान्स गिब्जने हवेत झेपावत त्यांचा मिडऑफला झेल घेतला तेव्हा स्टेडियममध्ये एकदम शांतता पसरली.

निवृत्तीच्या आधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर ९४ धावांवर बाद झाल्यावर पसरली तशी; परंतु त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील क्षेत्ररक्षण व स्थानिक क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणातील फरक वाडेकरांना त्यांच्या पहिल्याच डावात अनुभवायला मिळाला.

त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावातही वाडेकर केवळ ४ धावांवर बाद झाले. तेही लेग स्पिनर हॉलफर्डच्या गोलंदाजीवर. एरवी ते फिरकी गोलंदाजांची पिसे काढायचे. अगदी प्रसन्ना, चंद्रशेखरही त्यातून सुटले नाहीत. त्यानंतर कलकत्ता येथे झालेल्या दुसऱ्या व दुर्दैवी कसोटीतून वाडेकर यांना वगळण्यात आले; पण मद्रास येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्यांना पुन्हा संघात स्थान मिळाले; परंतु दुर्दैवाने त्या कसोटीच्या पहिल्या डावातही वाडेकर अपयशी ठरले. त्यामुळे दुसऱ्या डावात ते जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तेव्हा त्यांची कारकीर्दच पणाला लागली होती. मला चांगले आठवते की, तेव्हा वर्ग चुकवून रुईया महाविद्यालयासमोरील ए-वन ट्रेडर्सच्या दारात आम्ही सामन्याचे आकाशवाणीवरील धावते समालोचन ऐकत होतो. असे प्रकार फक्त किंग जॉर्ज शाळेतच शक्य होते.. आणि वाडेकरांचे अर्धशतक झाल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. त्या डावात ‘करो, या मरो’ थाटात वाडेकर यांनी हुकचा सढळ वापर करीत हॉल-ग्रिफिथवर असा काही प्रतिहल्ला चढविला की, बोलायची सोय नव्हती. अखेर खऱ्या वाडेकरांचे कसोटी क्रिकेटमध्ये आगमन झाले होते. त्यामुळे १९६७च्या मध्यावर इंग्लंडला जाणाऱ्या संघातील त्यांचे स्थानही पक्के झाले. त्यानुसार वाडेकर इंग्लंडला गेले व तेथील तिन्ही कसोटी सामन्यांत चमकले. त्या मालिकेतील तिसरा सामना एजबॅस्टन येथे झाला. त्या वेळी दुसऱ्या डावात वाडेकरांनी ७० धावा केल्या. त्या डावासंबंधी कर्णधार पतौडींनी ‘टायगर्स टेल’ या आत्मचरित्रात लिहिले की, ‘‘संपूर्ण मालिकेत अजितची खेळी निर्विवाद सर्वोत्तम होती.’’

वाडेकरांच्या अभिजात फलंदाजीचा दर्जा त्या दौऱ्यात क्रिकेट जगताने अनुभवला, परंतु पतौडी एवढय़ावरच थांबले नाहीत. त्यांनी आत्मचरित्रातील ‘क्रिकेट द वर्ल्ड गेम’ या प्रकरणात ब्रिटिश राष्ट्रकुलाबाहेरील आशिया व आफ्रिकेतील देश, युरोपमधील काही देश व अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार होऊ  लागल्याचे नमूद करून त्या अनुषंगाने लिहिले, ‘Cricket does not belong only to the Sobers and Pollocks and Wadekars, but to Buster Lloyd of Nyetimber Garage and the Pagham Village Cricket Club.’ यावरून स्वत: पतौडींना वाडेकरांच्या फलंदाजीविषयी काय वाटायचे, याची आजच्या युवा पिढीला कल्पना यावी. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली १९७१मध्ये भारताने वेस्ट इंडिज व त्यापाठोपाठ इंग्लंडला त्यांच्याच अंगणात हरवले. हा इतिहास सर्वश्रुत असल्याने व त्यावर वारंवार लिहून येत असल्याने त्याची द्विरुक्ती करीत नाही.

वाडेकरांच्या बॅटचा प्रसाद प्रसन्ना, चंद्रशेखर यांनाही वेळोवेळी मिळाला असल्याचे वर नमूद केले आहे. मार्च १९६४मध्ये म्हैसूर (आताचा कर्नाटक) व मुंबईदरम्यान बंगलोरला रणजी सामना झाला. म्हैसूरचा १५५ धावांत खुर्दा झाल्यावर प्रसन्ना व चंद्रशेखर यांनी मुंबईची अवस्था ४ बाद ७८ अशी केली होती. अशा अटीतटीच्या वेळी वाडेकर यांनी १२७ धावा करून मुंबईला विजय मिळवून दिला. त्यानंतर तीन वर्षांनी या दोन संघांतच मुंबईत झालेल्या सामन्यात वाडेकर यांनी त्रिशतक ठोकले. पुढे १९७०मध्ये मुंबई व म्हैसूर यांच्यात झालेल्या सामन्यात म्हैसूरने ३०९ धावा केल्यावर मुंबईने ८ बाद ५२० असे चोख उत्तर दिले. त्यात वाडेकरांच्या होत्या ९१ धावा. वाडेकरांचे कसोटी क्रिकेटमधील अविस्मरणीय डाव आजही चांगले आठवतात; पण एक शैलीदार फलंदीज म्हणून मनात ठसलेली त्यांची प्रतिमा कधीच पुसली जाणार नाही.

First Published on August 20, 2018 2:00 am

Web Title: indian cricketer ajit wadekar