भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. सध्या कोलकाता नाईटराइडर्सकडून खेळणारा दिनेश कार्तिक आयपीएल संपली की, नव्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी अवघ्या १०० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. इंग्लंडमध्ये नव्या स्वरुपाचं क्रिकेट खेळलं जाणार असून यात कार्तिक समालोचन करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत माजी दिग्गज क्रिकेटपटूंची टीम असणार आहे.

लवकरच इंग्लंडमध्ये नव्या स्वरुपातील ‘द हंड्रेड’ क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. या सामन्यात अवघे १०० चेंडू टाकले जाणार आहेत. आता हे १०० चेंडू कशा स्वरुपात गोलंदाज टाकणार हे लवकरच कळेल. मात्र या सामन्याच्या समालोचनासाठी दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. ‘द हंड्रेड’च्या ब्रॉडकास्टरने याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. दिनेश कार्तिकनेही याला दुजोरा देत आनंद व्यक्त केला आहे.

‘मी स्काय क्रिकेटसोबत पुन्हा आलो आहे. यावेळेस नव्या स्वरुपातील क्रिकेट आहे. जिथे १०० चेंडू असतील आणि १०० टक्के आनंद असेल. मी द हंड्रेड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतुर आहे’, असं ट्विट दिनेश कार्तिक याने केलं आहे.

IPL 2021: फिट असूनही हार्दीक पंड्याने गोलंदाजी केली नाही!; झहीर खानने केला खुलासा

दिनेश कार्तिकसह या समालोचन पॅनेलमध्ये स्टुअर्ट ब्रॉड, अँड्र्यु फ्लिंटॉप, केविन पीटरसन, डॅरेन सॅमी यांचाही समावेश आहे. भारत इंग्लंड मालिकेदरम्यान दिनेश कार्तिकने समालोचन केलं होतं. त्याची समालोचन शैली क्रिकेटप्रेमींना चांगलीच भावली होती.