भारताचा क्रिकेटपटू मयांक डागरने बीसीसीआयच्या यो-यो फिटनेस टेस्टमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतीय संघातील सिनीअर खेळाडू विराट कोहली आणि मनिष पांडेला मागे टाकत मयांकने १९.३ गुणांची कमाई केली. याआधी विराट कोहलीने फिटनेस चाचणीदरम्यान १९ तर मनिष पांडेने १९.२ गुणांची कमाई केली होती. मात्र हा विक्रम मयांकने आता मोडीत काढला आहे.

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी यो-यो फिटनेस टेस्ट बंधनकारक केली आहे. या टेस्टमध्ये नापास झालेल्या खेळाडूंना संघात जागा मिळत नाही. याआधी अंबाती रायडू, मोहम्मद शमी यांना फिटनेस टेस्ट पास न करता आल्यामुळे भारतीय संघातली आपली जागा गमवावी लागली होती. तर संजू सॅमसनलाही भारत अ संघातली जागा गमवावी लागली होती.

यो-यो फिटनेस टेस्ट पास होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला १६.१ गुणांची कमाई करावी लागते. काही वर्षांपूर्वी सुरेश रैना, युवराज सिंह यांच्यासारख्या दिग्गजांनाही फिटनेस टेस्टमुळे संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं होतं. मात्र यानंतर सुरेश रैनाने फिटनेस टेस्ट पास करत भारतीय संघात पुनरागमन केलं. मात्र युवराज सिंहला अशी कामगिरी करणं अजुन जमलेलं नाहीये. २१ वर्षीय मयांक डागर स्थानिक क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशचं प्रतिनीधीत्व करतो. आतापर्यंत मयांकने ११ प्रथमश्रेणी सामने, १० अ श्रेणीचे सामने व १३ टी-२० सामने खेळले आहेत.