महेंद्रसिंह धोनी, ‘बस नाम ही काफी है’, असं म्हणत भारतीय क्रिकेट संघातील या खेळाडूची ओळख केली तर अतिशयोक्ती होणार नाही. यशस्वी कर्णधार आणि क्रिकेटला कोळून प्यालेला एक खेळाडू हे सर्व गुण धोनीमध्ये दडले आहेत. सामना कोणताही असो, विरोधी संघ कितीही बळकट आणि महत्त्वाकांक्षी असो, धोनीच्या आत्मविश्वासापुढे बऱ्याचदा या सर्व गोष्टींचा प्रभाव फिका पडतो हे खरं. विविध विक्रमांना गवसणी घालणारा आणि कर्णधार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा धोनी सध्या एका नव्या भूमिकेत दिसतोय. कारण, सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या एका व्हिडिओमध्ये यष्टीरक्षण करणारा धोनी चक्क गोलंदाजी करताना दिसतोय.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे मनसुबे आता चांगलेच बळावले असून, पोर्ट एलिझाबेथ येथे पार पडणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सरावादरम्यान धोनीने फिरकी गोलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं. विरोधी संघातील खेळाडूंना धावबाद करण्याऱ्या आणि स्टंपिंगमध्ये त्यांचा बळी घेणाऱ्या धोनीचा गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ ‘बीसीसीआय’च्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला असून त्याला हजारो लाइक्सही मिळाले आहेत.

वाचा : भारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान!

संघातील खेळाडूंची साथ देत गोलंदाजी करण्याची धोनीची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरोधात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या तीन फिरकी गोलंदाजांच्या सहाय्याने धोनीनेही गोलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आता धोनी गोलंदाजीचा सराव करत असल्यामुळे पाचव्या एकदिवसीय सामन्यात तो मैदानावर गोलंदाज म्हणून उतरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळवला जाणारा पाचवा एकदिवसीय सामना भारतीय संघासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, ही मालिका खिशात टाकत भारतीय संघ आयसीसीच्या यादीत पहिलं स्थान कायम ठेवणार आहे.