भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश आहे. आज एक यशस्वी खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. पण आज करोडोंची संपत्ती असणाऱ्या धोनीचं एकावेळी ३० लाखांची कमाई करुन रांचीत शांततेत आयुष्य जगायचं हे स्वप्न होतं. भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर आपल्या ट्विटरवर हा खुलासा केला आहे.

२००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व करताना धोनीने भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिलं आहे. महेंद्रसिंग धोनी आज अनेक खेळाडूंसाठी आदर्श आहे. पण धोनीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताना वासीम जाफरने म्हटलं आहे की, “धोनीने मला सुरुवातीच्या दिवासंमध्ये आपल्याला क्रिकेटमधून ३० लाख रुपये कमवायचे आहेत असं सांगितलं होतं”.

“धोनीच्या भारतीय संघातील पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी त्याने मला सांगितलं होतं की, आपल्याला क्रिकेटमधून ३० लाख रुपये कमवायचे आहेत जेणेकरुन रांचीमध्ये पुढील आयुष्य सुखाने जगता येईल”. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वासीम जाफरने ही माहिती दिली.

मुंबईकर वासीम जाफरने गेल्या महिन्यात आपली निवृत्ती जाहीर केली असून ट्विटरवर एका चाहत्याने धोनीसंबंधीची एक आठवण विचारली होती. त्यावर उत्तर देताना वासीम जाफरने ही आठवण सांगितली. वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडविरोधात झालेल्या पराभवानंतर धोनी गेल्या आठ महिन्यांपासून भारतीय संघापासून दूर आहे. आयपीएलमधून धोनी कमबॅक करण्याची आशा होती. पण करोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आलं आहे.