भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंह यांनी अंबाती रायुडूकडे आपल्याला सिद्ध करण्यासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. महेंद्रसिंग धोनीसारखे वाईट खेळाडू नेहमी आपल्या आजुबाजूला नसतील असंही त्यांनी म्हटलं आहे. मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने गेल्या आठवड्यात निवृत्ती जाहीर केली आहे.

अंबाती रायुडूला विश्वचषक स्पर्धेतील १५ खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आलं नव्हतं. राखीव खेळाडूंमध्ये असून देखील शिखर धवन आणि विजय शंकर जखमी होऊनही अंबाती रायुडूला बोलावण्यात आलं नाही. त्याच्या जागी ऋषभ पंत आणि मयांक अग्रवाल यांना संधी देण्यात आली.

“रायुडूने अजून खेळायला हवं होतं. त्याने रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफीत खेळायला हवं होतं. १००, २००, ३०० धावा त्याने करायला हव्या होत्या. त्याच्यात अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे”, असं योगराज यांनी म्हटलं आहे. “रायुडू माझ्या मुला तू खूप घाईत निर्णय घेतलास. निवृत्तीचा निर्णय मागे घे आणि तू काय चीज आहेस दाखवून दे”, असं योगराज यांनी सांगितलं आहे.

माजी कर्णधार सौरव गांगुलीने कशापद्दतीने तरुण खेळाडूंना संधी दिली हे सांगताना योगराज यांनी महेंद्रसिंग धोनीवर टीका केली. त्याच्यासारखी लोक जास्त काळ आजुबाजूला नसतील असंही त्यांनी म्हटलं आहे.