भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा आता आपल्याला मोबाईल अॅपच्या माध्यमातून भेटणार आहे. न्युयॉर्क येथील टेक्नोलॉजी फर्म ‘एस्केप एक्स’ यांच्या मदतीने जाडेजाने आज आपलं स्वतःच मोबाईल अॅप लाँच केलं. स्वतःचं अॅप असणारा रविंद्र जाडेजा हा भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

हे अॅप जाडेच्या चाहत्यांसाठी एका अर्थाने पर्वणीच ठरणार आहे. सोशल मीडियावरच्या रविंद्र जाडेजाच्या प्रत्येक घडामोडी तसेच जाडेजाशी थेट संवाद साधण्याची संधीही चाहत्यांना मिळणार आहे. यामुळे टीम इंडियात ‘सर जाडेजा’ नावाने प्रसिद्ध असलेला आपला आवडता खेळाडू त्याच्या खासगी आयुष्यात कसा वावरतो हे त्याच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

या अॅपमध्ये पुश नोटीफिकेशन्स, फिचर व्हिडीओ, सुपरस्टार पोस्ट, तसेच चाहत्यांसाठी स्पर्धा असे विविध फिचर्सही असणार आहेत. रविंद्र जाडेजासारख्या आंतराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूसोबत काम करायला मिळालं हे आपल्या कंपनीचं भाग्य असल्याची भावना यावेळी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. या अॅपमुळे रविंद्र जाडेजाच्या जगभरातल्या चाहत्यांना त्याच्याशी संवाद साधण शक्य होणार असल्याचं कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणलं आहे.

या सोहळ्यावेळी जाडेजाही अतिशय आनंदात होता. आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी एका मंचाची आपल्याला गरज होती. ती गरज आज या अॅपमुळे भरुन निघणार असल्याचं जाडेजाने म्हणलंय. त्यामुळे मैदानासह सोशल मीडियावरही फटकेबाजी करणाऱ्या रविंद्र जाडेजाचं हे अॅप चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी ठरेल यात काही वाद नाही.