क्रिकेट विश्वात जेव्हा एखादा खेळाडू खेळण्यास सुरूवात करतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हे त्याचे अंतिम लक्ष्य असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवायचे असेल, तर त्यासाठी त्यांना अनेक देशांतर्गत स्पर्धांमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागते. भारतात जो खेळाडू पहिला टप्पा पार करतो, त्याला आधी भारत अ संघात स्थान दिले जाते आणि त्यानंतर चांगला खेळ केल्यास टीम इंडियामध्ये स्थान मिळते. भारतीय संघाची निवड समिती देशभरातून त्या खेळाडूंना निवडते. संघात काही खेळाडूंना संधी मिळते तर काहींना वाच पहावी लागते. पण सध्या सौराष्ट्र रणजी संघाचा यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सन याने भारतीय संघाच्या निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सौराष्ट्रकडून खेळताना शेल्डनने उत्तम कामगिरी केली होती. पण यंदा त्याची भारत अ संघात निवड होऊ शकली नाही. त्यामुळे त्याने निवड समितीवर नाराजी व्यक्त केली आहे. “सौराष्ट्र संघ यंदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला. सर्व स्तरातील स्पर्धांमध्ये चांगला खेळ करूनही संघातील एकाही खेळाडूची भारत अ संघात निवड करण्यात आली नाही हे फारच आश्चर्यकारक आहे. रणजी करंडक स्पर्धेतील कामगिरीला काहीही अर्थ नसतो का? की छोट्या आकाराच्या राज्यातील खेळाडूंना आणि संघांना निवड प्रक्रियेत गांभीर्याने घेतले जात नाही. गेल्या ५ वर्षात सौराष्ट्र संघ ३ वेळा सितांशु कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. संघातील सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे, तरीही कोणालाच संघात घेण्यात आले नाही. असं असेल तर चांगलं खेळून काय उपयोग?”, असा शेल्डनने उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, स्थानिक खेळाडूंनी निवड समितीवर अशा प्रकारे नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेक वेळा निवड समिताच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.