T20 World Cup 2020 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी २० विश्वचषक २०२० क्रिकेट स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड असे ४ संघ उपांत्य फेरीत पोहोचले. अ गटात भारताने अव्वल स्थान पटकावले, तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. या गटात असलेल्या बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांचे आव्हान संपुष्टात आले. श्रीलंका विरूद्ध बांगलादेश असा सोमवारी (२ मार्च) साखळी फेरीतील अ गटाचा शेवटचा सामना खेळण्यात आला. या सामन्यात श्रीलंका महिला संघाने ९ गडी राखून विजय मिळवला.

श्रीलंकेची अष्टपैलू क्रिकेटपटू शशिकला सिरिवर्धने हिचाही शेवटचा सामना होता. या सामन्यानंतर तिने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. त्या सामन्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाने तिचा महिला क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मान केला.

भारतीय महिला संघाचा श्रीलंका महिला संघाविरूद्ध २९ फेब्रुवारीला सामना झाला. या सामन्यानंतर भारतीय महिला संघाने शशिकलासाठी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या जर्सीवर शुभेच्छा लिहून स्वाक्षऱ्या केल्या आणि ही जर्सी भारतीय संघातील मराठमोळ्या क्रिकेटपटू स्मृती मानधनाने शशिकलाला भेट दिली.

शशिकलाने २००३ मध्ये विंडीज महिला संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले. तिने ११८ एकदिवसीय सामने खेळले. त्यामध्ये तिने १८ च्या सरासरीने दोन हजार २९ धावा केल्या. त्याचबरोबर तिने ८१ आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळले. त्यात १७ च्या सरासरीने १ हजार ९७ धावा केल्या आहेत. या शिवाय शशिकलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१ बळी टिपले. टी २० विश्वचषक २०२० मध्येही तिने ३ सामन्यात ७ बळी टिपले.