सध्या क्रिकेट विश्वात भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश या संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ट्राय सीरिजच्या चर्चा सुरु असून, भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सीरिजमध्ये भारताला श्रीलंकेच्या संघाकडून हार पत्करावी लागली होती. पण, पुढील सामन्यात बांग्लादेशला नमवत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाने या मालिकेत पुनरागमन केलं. बांग्लादेशला नमवल्यानंतर भारतीय खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं. ज्याचे पडसाद ड्रेसिंग रुम आणि संपूर्ण टीममध्ये पाहायला मिळाले.

खेळाडूंच्या मनावर असणारं दडपण कमी झाल्यानंतर त्यांनी मोकळ्या वेळेत धमाल केल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे यामध्ये सुरेश रैनामध्ये दडलेले सुप्त गुणही सर्वांसमोर आले. सुरेशने हॉटेलमध्ये गाणं सादर करणाऱ्या कलाकारांना साथ देत त्यांच्या जोडीने किशोर कुमार यांनी गायलेलं, प्रचंड लोकप्रिय असं ‘ये शाम मस्तानी’ हे गाणं गायलं. ताल, सूर आणि गाण्याचे भाव यांची समज असल्यामुळे सुरेशने एका पट्टीच्या गायकाप्रमाणेच हे गाणं सादर केलं. त्यामुळे किशोर दांच्या आवाजाची जादू त्याच्यावरही झाली, असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

गिटार, रिदम आणि रैनाचा सुरेख आवाज यांमुळे ‘ये शाम मस्तानी’चं हे व्हर्जन सोशल मीडियावरही बरंच पसंत केलं गेलं. ‘बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही रैनाच्या गायनकलेचा उत्तम नमुना असणारा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.