सध्या सुरु असणाऱ्या ट्राय सीरिजमध्ये काही खेळाडू खऱ्या अर्थाने त्यांच्या खेळाचं प्रदर्शन करत चमकत असल्याचं पहायला मिळत आहे. अशाच खेळाडूंच्या यादीतील एक नाव म्हणजे सुरेश रैना. बऱ्याच काळानंतर भारतीय संघात जागा मिळवणाऱ्या सुरेश रैनाने या ट्राय सीरिजमध्ये दर्जेदार खेळ दाखवत निवड समितीचा निर्णय सार्थ ठरवण्याच्या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. निदाहास चषक तिरंगी टी२० मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रैनाने टीपलेला एक अविश्वसनीय झेल पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळाली.

श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात शार्दुल ठाकूर आणि मनिष पांडे या खेळाडूंसोबतच सुरेश रैनाच्या असामान्य क्षेत्ररक्षणावरही सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये ज्यावेळी शार्दुल ठाकूरने धनुष्का गुणतिलका या फलंदाजासाठी आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. त्यावेळी गुणतिलकाने मोठ्या ताकदीने तो चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटकावला. त्या दिशेलाच मैदानात रैनाला क्षेत्ररक्षणासाठी तैनात करण्यात आलं होतं. त्यामुळे गुणतिलकाने जोरदार फटका मारलेल्या तो चेंडू चार धावांची कमाई करतो, की मग षटकाराच्या रुपात सीमारेषा ओलांडतो असं वाटत असतानाच रैनाने झेप घेत शक्य नसलेला तो झेल टीपला.

अवघ्या काही क्षणातच रैनाने केलेली ही किमया पाहता मैदानावर उपस्थितांचाही विश्वासच बसेना. रैनाने तो झेल टीपलाच कसा हाच प्रश्न क्रीडारसिकांच्या मनात राहून राहून घर करत होता.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

दरम्यान, श्रीलंकेविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. शार्दुल ठाकूरने चार षटकांमध्ये २७ धावांच्या बदल्यात श्रीलंकेचे ४ गडी तंबूत पाठवले. त्याच्या या खेळीमुळे श्रीलंकेच्या फलंदाजांवर नियंत्रण मिळवत टीम इंडियाला यश संपादन करणं शक्य झालं.