भारतीय क्रिकेट संघात एक प्रकारचं नवचैतन्य आणणारा विराट कोहली अनेकांच्याच आवडीचा क्रिकेटपटू झाला आहे. अवघ्या काही वर्षांमध्ये त्याने मिळवलेली ओळख आणि खेळ्याच्या बळावर कमावलेलं नाव या सर्व गोष्टींचा अनेकांनाच हेवा वाटतो. पण, नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात त्याप्रमाणे विराटचे काही गुण मात्र अनेकांना पटतही नाहीत. सध्याच्या घडीला असे म्हणण्याचे कारण की, दक्षिण आफ्रिका संघातील माजी खेळाडू पॉल हॅरिस याने विराटविषयी केलेलं एक ट्विट. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान विराटचं वागणं विदूषकी असल्याचं हॅरिसचं म्हणणं आहे.

३९ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज गोलंदाज हॅरिसने ट्विट करत लिहिलं, ‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी विराट कोहलीचं वर्तन विदुषकासारखं होतं; मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आयसीसीला बहुतेक रबाडा आणि दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या वर्तनामध्येच उणिवा दिसल्या असाव्यात.’ हॅरिसचं हे ट्विट पाहता त्याने आयसीसीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे, असंच म्हणावं लागेल.

वाचा : विराटनं भेट दिलेली बॅट घेऊन ‘ती’ पोहोचली भारतात

विराटविषयी हॅरिसने नेमकं अशा आशयाचं ट्विट का केलं, हाच प्रश्न क्रिडारसिकांच्या मनात घर करत होता. पण, रबाडासोबत उडालेल्या त्याच्या शाब्दिक चकमकीलाच हॅरिसने नजरेत घेऊन हे ट्विट नीट वाचल्यास लक्षात येत आहे. रबाडाच्या गैरवर्तणूकीसाठी आयसीसीने त्याच्यावर दोन कसोटी सामन्यांची बंदी घातली होती. असं असताना विराटच्या विदुषकी वागण्यावर कोणतीच कारवाई का करण्यात आलेली नाही, हा खोचक प्रश्न हॅरिसने उपस्थित केला.