06 July 2020

News Flash

भारतीय क्रिकेटपटूंसाठी ‘विश्रांती स्वागतार्ह’!

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणू संसर्गामुळे क्रीडा क्षेत्र स्थिरावले आहे, देशात संचारबंदी लागू आहे. ही भारतीय क्रिकेटपटूंसाठी ‘विश्रांती स्वागतार्ह’ आहे, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. गतवर्षी इंग्लंडला झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेपासून शास्त्री १०-११ दिवसच घरी घालवू शकले होते.

करोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा थांबल्या आहेत. क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामनेसुद्धा स्थगित करण्यात आल्याने वेळापत्रकच कोलमडणार आहे. या संदर्भात शास्त्री म्हणाले, ‘‘न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर मानसिक थकवा, शारीरिक तंदुरुस्ती आणि दुखापती ही आव्हाने समोर उभी ठाकली होती. त्यामुळेच या विश्रांतीकडे मी नकारात्मक पद्धतीने पाहात नाही.’’

न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळला. या प्रदीर्घ दौऱ्यानंतर आता खेळाडूंनी या विश्रांतीद्वारे ताजेतवाने व्हावे, असे आवाहन शास्त्री यांनी केले.

‘‘गेल्या महिन्यांत भारतीय संघ बरेच सामने खेळला. त्यातून चांगले निकालसुद्धा दिले. माझ्यासह काही साहाय्यक प्रशिक्षकांनी गतवर्षी २३ मे रोजी विश्वचषक स्पध्रेसाठी भारत सोडला होता. त्यानंतर फक्त १०-११ दिवसच गृहदर्शन घडू शकले होते,’’ अशा भावना शास्त्री यांनी व्यक्त केल्या.

‘‘भारतीय संघातील काही खेळाडू तर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळतात. गेल्या वर्षभरात भारतीय संघाने अनेक देशांचे दौरेसुद्धा केले. त्यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेटनंतर कसोटी क्रिकेटमध्ये जुळवून घेण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे होते. त्यामुळे या खडतर काळातील विश्रांती खेळाडूंसाठी उपयुक्त ठरेल,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

न्यूझीलंड दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील मालिका करोनामुळे अर्धवट थांबवण्यात आली. याविषयी शास्त्री म्हणाले, ‘‘न्यूझीलंड दौऱ्याहून सिंगापूरमार्गे परततानाच करोनाची चाहूल लागली. मग मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेला प्रारंभ झाला, तेव्हा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी चर्चा सुरू झाली. त्यामुळे आम्ही सावध होतो. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासह मालिका स्थगित करण्याच्या सूचना आल्या, त्या वेळी या गंभीर वास्तवाची जाणीव झाली.’’

या कठीण कालखंडात खेळाडूंनी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शास्त्री यांनी केले. ‘‘करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, म्हणून स्वत:ची आणि इतरांचीही स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची आहे, असे मला वाटते. याचे गांभीर्य पटवून देत घरीच राहण्याचे आव्हान खेळाडू करीत आहेत. कर्णधार विराट कोहलीसह आणखी काही खेळाडूंनीही समाजमाध्यमांवर नागरिकांना आव्हान केले आहे.’’

विराटच भारतीय क्रिकेटचा सर्वेसर्वा – शास्त्री

विराट कोहलीच भारतीय क्रिकेटचा सर्वेसर्वा असून, त्याच्यावरील ताण कमी करण्याची जबाबदारी साहाय्यक मार्गदर्शक हिमतीने पार पाडत आहेत, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १२ कसोटी विजयांचा जागतिक विक्रम साकारला आहे. या संदर्भात शास्त्री म्हणाले, ‘‘कर्णधार हा संघाचा प्रमुख असतो, यावर माझा विश्वास आहे. खेळाडूंना मैदानावर जाऊन सकारात्मक, निर्भीडपणे आणि हिमतीने खेळता यावे, यासाठी मार्गदर्शक त्यांना सज्ज करीत असतात,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:34 am

Web Title: indian cricketers have relaxation ravi shastri abn 97
Next Stories
1 फुटबॉलपटू डोव्हाल औषधविक्रेत्याच्या भूमिकेत!
2 ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणारच!
3 उरुग्वेच्या प्रशिक्षकांसह ४०० जणांना अर्धचंद्र
Just Now!
X