‘बीसीसीआय’च्या योजनेबाबत गांगुलीकडून माहिती

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित देशांतर्गत क्रिकेट हंगाम पुढील वर्षी १ जानेवारीपासून सुरू होईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने शनिवारी दिली.

‘बीसीसीआय’च्या कार्यकारिणी समितीची बैठक रविवारी होणार असून, यात करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या स्थानिक क्रिकेट हंगामाबाबत गांभीर्याने चर्चा होईल. तात्पुरत्या स्वरूपात १ जानेवारी ही हंगामाच्या प्रारंभाची तारीख निश्चित केली आहे, असे गांगुलीने सांगितले. मागील वर्षीप्रमाणेच क्रिकेट स्पर्धाचे आयोजन होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना गांगुलीने म्हटले की, सद्य:स्थितीत तरी व्यावहारिकदृष्टय़ा ते शक्य नाही.

‘‘रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा पूर्ण स्वरूपात आयोजनाविषयी आम्ही आशावादी आहोत. पण सर्व स्पर्धाचे आयोजन करणे अशक्य आहे. कारण कनिष्ठ वयोगटांच्या आणि महिलांच्या क्रिकेट स्पर्धाही आयोजित करायच्या आहेत,’’ असे गांगुलीने सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याच्या वेळापत्रकावर चर्चा

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने मालिकांचे वेळापत्रक पाठवले असून, याबाबतही बैठकीत चर्चा होईल, असे गांगुलीने सांगितले. जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याशिवाय तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकांचाही समावेश आहे.

इंग्लंड दौऱ्याच्या निर्णयासाठी अवधी

देशातील परिस्थितीचा ‘बीसीसीआय’कडून आढावा घेतला जात असून, इंग्लंड दौऱ्याबाबत निर्णय घेण्यासाठी अजून बराच अवधी आपल्याकडे आहे, असे गांगुली यावेळी म्हणाला. इंग्लंडचा संघ साडेतीन ते चार महिन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. परंतु देशातील करोनाच्या स्थितीवर या मालिकेचे भवितव्य अवलंबून आहे, असे गांगुलीने सांगितले.