वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला असला तरी कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीने आवडला नाही आणि त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे या प्रकारासाठी कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी देखील मागितली.

वर्ल्डकपमध्ये रविवारी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात शिखर धवनची शतकी खेळी आणि विराट कोहली- रोहित शर्मा यांच्या अर्धशतकी खेळीने भारताने ५० षटकांमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावा केल्या. कोहली फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्मिथची प्रेक्षकांकडून हुर्यो उडवली जात होती. वर्ल्डकप सुरु झाल्यापासून स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना सातत्याने अशा घटनांचा सामना करावा लागत आहे. रविवारच्या सामन्यात अखेर कोहलीनेच पुढाकार घेत प्रेक्षकांना खडसावले आणि त्यांना स्मिथसाठी टाळ्या वाजवण्याचा इशारा केला. यानंतर कोहलीने स्मिथची माफी देखील मागितली. कोहलीच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेतही कोहलीला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोहली म्हणाला, जे घडलंय त्याला खूप कालावधी झाला आहे. आता स्मिथ मैदानात परतला आहे. एखाद्याचे असे खच्चीकरण करणे योग्य नाही. एखाद्या खेळाडूला मैदानात उतरल्यावर वारंवार अशा घटनांचा सामना करावा लागणं चुकीचेच आहे.

आज मैदानात भारतीय प्रेक्षकांची संख्या जास्त होती. स्मिथने काहीच चुकीचे केले नव्हते ज्यासाठी त्याची हुर्यो उडवली पाहिजे. भारतीय प्रेक्षक त्याची हुर्यो उडवत होते, हे पाहून मलाच वाईट वाटले. समजा माझ्या हातून स्मिथसारखी चूक झाली असती आणि ती मान्य करुन मैदानात परतलो असतो आणि तरी देखील माझी हुर्यो उडवली असती तर मला देखील ते आवडले नसते. म्हणूनच मी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी मागितली, असे कोहलीने सांगितले.