चौथ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीदरम्यान भारताच्या चाहत्याने वर्णद्वेषी शिवीगाळ केल्याचा आरोप दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरने केला आहे. याची गंभीर दखल घेत दक्षिण आफ्रिका बोर्डाने (सीएसए) चौकशीचे आदेश दिले आहे.

जोहान्सबर्गमध्ये चौथ्या लढतीमध्ये ताहीरला अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र राखीव (१२वा) क्रिकेटपटू म्हणून कर्तव्य बजावताना भारताच्या चाहत्याने त्याला उद्देशून वर्णद्वेषी शिवीगाळ केल्याचे दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी म्हटले आहे.

‘‘एका व्यक्तीने वर्णद्वेषी  शब्दप्रयोग करून ताहीरचा अपमान केला. त्याने वारंवार तसे केले. ताहीरने ड्रेसिंगरूमसमोरील सुरक्षा अधिकारी आणि त्याच्यासोबत असलेल्या वैयक्तिक सुरक्षारक्षकांना याची माहिती दिली. इम्रानच्या मते, ती व्यक्ती भारतीय संघाचा चाहता आहे,’’ असे मुसाजी यांनी सांगितले.