केरळ ब्लास्टरचा गोलरक्षक संदीप नंदीचे मत

‘इंडियन सुपर लीगमुळे (आयएसएल) भारतीय फुटबॉल क्षेत्रात बरेच बदल झाले. पायाभूत सुविधांपासून ते खेळासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आणि याच सकारात्मक बदलांमुळे भारतीय फुटबॉलची प्रगती होत चालली आहे,’ असे मत केरळ ब्लास्टर एफसीचा गोलरक्षक संदीप नंदीने व्यक्त केले. भारताचा यशस्वी गोलरक्षक सुब्राता पॉलसमोर आयएसएलच्या या मोसमात ‘गोल्डन ग्लोज’च्या शर्यतीत नंदीने कडवे आव्हान उभे केले आहे.  ४१व्या वर्षीही त्याच्या चापल्यासमोर प्रतिस्पर्धी खेळाडूंना हार मानावी लागत आहे.

आय-लीग, फेडरेशन चषक, डुरांड चषक, आयएफए ढाल, आदी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा गाजवणाऱ्या नंदीला आयएसएलने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. २००४ साली राष्ट्रीय संघातून पदार्पण करणाऱ्या नंदीने भारताच्या अनेक विजयांत मोलाचा वाटा उचलला. ‘आयएसएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. युवा खेळाडूंसाठी हे मोठे व्यासपीठ आहे आणि वयाच्या ४१व्या वर्षी मला ही संधी मिळाली, हे माझे नशीब म्हणावे लागेल,’ असे नंदी सांगतो.

आय-लीग आणि आयएसएल यांच्या दर्जाविषयी त्याला छेडले असता तो म्हणाला, ‘आयएसएलमुळे बऱ्याच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली. प्रायोजक आल्यामुळे हे शक्य झाले. आम्हाला योग्य मैदान, पोषक वातावरणात खेळता येते. खेळाडूंच्या विकासासाठी या बाबी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आय-लीगदरम्यान मैदान मिळवण्यापासून सुरुवात करावी लागायची. कधी गवताच्या, तर कधी अ‍ॅस्ट्रो टर्फवर खेळावे लागायचे. बऱ्याचदा टर्फवरच खेळायचो.’

केरळ संघाला गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते; परंतु यंदा जेतेपद पटकावण्याचा निर्धार नंदीने बोलून दाखवला आहे. आय-लीग आणि आयएसएल यांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता नंदीने सावध पवित्रा घेतला. तो म्हणाला, ‘याबाबत बरेच विवाद सुरू आहेत, त्यामुळे मी मत मांडणे उचित ठरणार नाही. मात्र फुटबॉलचे भले होत असेल तर विलीनीकरण करण्यास हरकत नाही.’

नॉर्थ ईस्ट युनायटेड व पुणे सिटीला अखेरची संधी

आयएसएलमध्ये मंगळवारी नॉर्थ ईस्ट युनायटेड व पुणे सिटी एफसी हे स्पध्रेतील आशा कायम राखण्यासाठी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. ही लढत घरच्या मैदानावर होत असल्यामुळे युनायटेडचे पारडे किंचितसे जड दिसत आहे.