भारतात क्रिकेटला धर्म मानला जातो. प्रत्येक गल्लीबोळात क्रिकेट खेळताना मुले दिसतात. लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनात क्रिकेटविषयी वेगळे च प्रेम दिसून येते. पण आता हळूहळू क्रिकेटबरोबरच कबड्डी, फूटबॉल, हॉकी, बॅडमिंटन या खेळांनाही भारतीयांची पसंती मिळत आहे. FIFA World Cup 2018 मुळे सध्या जगभरात फुटबॉल फिव्हर चढला आहे. मात्र भारतातील फुटबॉल फिव्हरचे कारण आहे भारतीय संघाची इंटनकॉन्टिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी.

मुंबईमध्ये सुरु असलेल्या इंटनकॉन्टिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेत आज न्यूझीलंड विरुद्ध भारताचा सामना होणार आहे. या स्पर्धेत भारताने एकूण २ सामने खेळले असून दोनही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारताने चायनीज तैपई संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने केनियाचा ३-० असा धुव्वा उडवला. त्यामुळे भारताची अंतिम सामन्यातील स्थान जवळपास निश्चित आहे.

आज होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याची संपूर्ण तिकिटे विकली गेली आहेत. भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने भारतीय प्रेक्षकांना सामना पाहायला आवाहन केले होते. या आवाहनाला दणक्यात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. त्यानंतर आता आज होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठीही स्टेडियम हाऊसफुल्ल झाले आहे, तसेच भारताचे स्थान निश्चित मानल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची पूर्ण तिकिटेही विकली गेली आहेत.

१० जूनला अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. सध्या गुणांच्या तक्त्यानुसार, भारत २ विजयांसह अव्वल आहे. तर केनिया २ पैकी १ सामना जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आणि चायनीज तैपेई संघ १ सामना गमावून ० गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे.