आंतरखंडीय चषकाचे जेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंचे प्रशिक्षक कॉन्स्टन्टाइन यांच्याकडून कौतुक

आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये भारतीय संघाने त्यांचे कौशल्य आणि उसळून उठण्याच्या त्यांच्या क्षमतेचे दर्शन घडवले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने सामन्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनदेखील अधोरेखित केला असल्याने पुढील वर्षांच्या आशियाई चषकात भारत लिंबूटिंबू संघ म्हणून उतरणार नसल्याचा विश्वास भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टन्टाइन यांनी व्यक्त केला आहे.

आंतरखंडीय चषकात केलेल्या कामगिरीने आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.‘‘आता पुढील आशियाई चषकाचे आव्हान अधिक मोठे असून त्या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. जर आम्ही चांगला खेळ आणि योग्य ताळमेळ राखू शकलो तर आम्हाला गटातून पात्र होण्याची संधी मिळू शकणार असून तेच आमचे लक्ष्य आहे,’’ असे कॉन्स्टन्टाइन यांनी सांगितले.

‘‘आंतरखंडीय स्पर्धेमुळे आम्हाला आशियाई चषकाची पूर्वतयारी करण्याची संधी मिळाली आहे. आशिया चषकात अंतिम १६ पर्यंत तरी आम्ही निश्चितपणे धडक मारू शकतो, इतका आत्मविश्वास या स्पर्धेने दिला आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले.

छेत्री, संधूची स्तुती

‘‘कर्णधार सुनील छेत्री आणि गोलरक्षक गुरुप्रीतसिंग संधू या दोघांची कामगिरी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम होती. सुनील तर कमालीचा तंदुरुस्त असून त्याच्या कामगिरीने तर आम्ही सगळेच प्रभावित झाले आहेत. आशियाई चषकात तो भारताचे प्रमुख अस्त्र राहणार आहे. फुटबॉलसाठी असलेले त्याचे समर्पण अतुलनीय आहे व त्यामुळेच तो सवरेत्कृष्ट आहे,’’ असे कॉन्स्टन्टाइन म्हणाले.